Breaking News

शेकापचा उतरता आलेख

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. पक्षाची ध्येय-धोरणे आणि विचारसरणीशी निष्ठा असणारा ऋषितुल्य नेता निमाला. अभ्यासू, संयमी आणि प्रचंड जनसंपर्क असलेल्या या नेत्याला आपल्या अखेरच्या काळात पक्षाची झालेली पडझड पाहून दुःख वाटत होते. शेकापच्या वर्धापन दिनाला दोनच दिवस उरले असताना त्यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर, झालेली पडझड रोखून पुन्हा उभारी घेण्याच्या दृष्टीने वर्धापन दिनाच्या निमित्ताने पक्ष म्हणून शेकाप आता काय चिंतन करणार याकडे महाराष्ट्र आणि विशेषतः रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेक छोटे मोठे राजकीय पक्ष उदयास आले. त्यापैकी मोजकेच पक्ष वाढत गेले आणि आपले स्थान आजही टिकवून आहेत. कोणे एके काळी महाराष्ट्रातील राजकारणात शेतकरी कामगार पक्षाला महत्त्वाचे स्थान होते. राज्यात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि कामगारांसाठी उभा राहिलेला खमका पक्ष म्हणून शेकापचा दबदबा होता. डाव्या विचारसरणीला मानणारा म्हणून या पक्षाची ख्याती होती. जातीपातीचे राजकारण बाजूला सारून तळागाळातल्या सामान्य आणि श्रमजीवी कार्यकर्त्यांची अभेद्य फळी महाराष्ट्रात आणि विशेषत: रायगड जिल्ह्यात शेकापच्या रूपाने उभी राहात होती. पक्षासाठी काहीपण या भावनेने लढणारे सामान्य कार्यकर्ते या पक्षाशी जोडले गेले होते. रायगड हा शेकापचा बालेकिल्ला होता. 1952 ते 99 पर्यंत रायगड जिल्ह्यावर शेकापचा प्रभाव होता. दि. बा. पाटील, दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, दत्तूशेठ पाटील, जनार्दन भगत, वीर वाजेकर या नेत्यांनी रायगडचा आवाज बुलंद ठेवला होता, मात्र काळानुसार बदललेले नेतृत्व, त्यांचे आत्मकेंद्रित राजकारण, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा याचा परिणाम पक्षावर होत गेला. शेकापचे खंबीर नेतृत्व करणारे नेते हळूहळू पक्षापासून दुरावले किंबहुना नव्या नेतृत्वाने त्यांना दूर सारले. मग अनेक नेत्यांनी इतर पक्षांचा मार्ग धरला. त्यामुळे शेकाप खिळखिळा होऊ लागला. बदलत्या भूमिकेत नेत्यांनी पक्ष स्वत:भोवती केंद्रित केल्याचे दिसू लागले. पक्षाच्या ताकदीचा वापर शेतकरी, कामगार आणि सामान्य माणसांसाठी न करता वैयक्तिक राजकारणासाठी केला गेला. राजकीय स्थित्यंतरे होत असताना स्वार्थ आणि सत्तेच्या हव्यासापोटी पक्षाची ध्येयधोरणे, तत्वज्ञान आणि विचार खुंटीला टांगण्यात आले. तरीही शेकापचा हाडाचा सामान्य कार्यकर्ता कायम पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन जयजयकारच करीत राहिला. त्यामुळे जिल्ह्यात काही तालुक्यांपुरते का होईना पण पक्षाचे अस्तित्व टिकून होते. मात्र एका बाजूला काँग्रेसशी कट्टर राजकीय वैर तर धार्मिकतेच्या मुद्द्यावरून शिवसेनेशी फटकून वागणार्या शेकापने सत्तेच्या लालसेपोटी याच पक्षांशी वेळोवेळी युती केली आणि तीच शेकापच्या राजकीय र्हासाला कारणीभूत ठरली. सत्ता-पैसा, उद्योग-धंदे आणि राजकारण यांची सांगड घालताना केलेल्या तडजोडी, त्यातून सर्वच स्तरावर झालेला भ्रष्टाचार, कर्नाळा बँकेतील आर्थिक लूट याचा धक्का पक्षाशी संबंधित नसलेल्यांना तर बसलाच, पण शेकापचे कट्टर कार्यकर्ते, छोटे छोटे नेते यांना तर आपल्याच माणसांनी आपल्याला फसवल्याचे जिव्हारी लागले. सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांसमोर शेकाप उघडा पडत गेला. त्यामुळे परिस्थिती एवढी बदलली की वडील शेकापमध्ये आणि मुलगा दुसर्या पक्षात अशी वेळ आलेल्या या पक्षातील स्थानिक नेत्यांनीही खुलेआम पक्षांतर करायला सुरुवात केली. परिणामी पक्ष अस्ताला जाऊ लागला आहे. पण याची जाणीव पक्षाच्या श्रेष्ठींना झाल्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. अनेक बर्या-वाईट गोष्टी घडल्या आणि घडवल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता तरी ही नेतेमंडळी चिंतन करून काही बदल करणार की आपण म्हणू तीच पूर्व दिशा अशी हाकाटी पिटत राहणार यावरच शेकापचे उरलेसुरले अस्तित्व आणि भवितव्यही अवलंबून आहे.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply