उरण : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील तु. ह. वाजेकर विद्यालयात संविधान व शहीद दिन असा दुहेरी कार्यक्रम झाला.
सातवी ‘अ’च्या वर्गाने कार्यक्रमाचे नियोजन केले होते. विद्यालयाचे प्राचार्य मोहन पाटील, उपमुख्याध्यापक ए. यू. खाडे, पर्यवेक्षक जी. सी. गोडगे, आशा मांडवकर, सांस्कृतिक विभागप्रमुख एच. एन. पाटील, वर्गशिक्षिका दर्शना माळी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यानंतर सर्व विद्यार्थ्यांकडून सामुदायिकपणे भारतीय संविधानाचे प्रकट वाचन करण्यात आले. त्याचप्रमाणे 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवान व पोलिसांना
आदरांजली वाहण्यात आली. संविधान दिनानिमित्त विद्यालयात वक्तृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. शेवटच्या तासिकेला यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक एन. एल. गावंड यांनी संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. इयत्ता सातवी ‘अ’च्या पाच विद्यार्थ्यांनी संविधान दिनावर भाषणे केली. इयत्ता दहावीची विद्यार्थिनी अमिषा वैष्णव हिने ए मेरे वतन के लोगो या देशभक्तीपर गीताचे गायन केले, तर एच. एन. पाटील यांनी संविधान गीत गायिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानस ठाकूर याने, तर आभार आर्यन म्हात्रे याने मानले.