Breaking News

गणपतराव देशमुख पंचत्वात विलीन; सांगोला येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सोलापूर ः प्रतिनिधी

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री सोलापुरातील खासगी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि. 31) सांगोला येथील शेतकरी सहकारी सुतगिरणी या ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ पुत्र पोपटराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, नातू डॉ. बाबासाहेब व अनिकेत यांनी गणपतरावांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला, तर त्यांच्या पत्नी रतनबाई यांना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज देण्यात आला. या वेळी आमदार गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आदी उपस्थित होते.  आबा म्हणून ओळखल्या जाणार्‍या गणपतरावांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून 11 वेळा प्रतिनिधित्व केले होते. साध्या राहणीमुळे ते सुपरिचित होते. आयुष्यभर तत्त्वे जपून समाजकारण करणार्‍या आबांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला.

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने महाराष्ट्रातील मार्गदर्शक हरपला आहे. ते सुस्वभावी होते आणि त्यांचे सर्वांशी चांगले संबंध होते. सहकार, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील त्यांचे कार्य अतुलनीय होते. त्यांची सुतगिरणी पहायला आम्ही गेलो होतो. अनेकदा त्यांच्या सांगोला येथील निवासस्थानीही गेलो होतो. त्यांच्याजवळ बसल्यावर वडिलधार्‍या माणसाजवळ बसल्याचे समाधान मिळत होते. राजकारण त्यांना कधी शिवले नाही. सातार्‍याला रयत शिक्षण संस्थेत दरवर्षी 9 मे रोजी आमची भेट होत असे. सात-आठ वर्षांपूर्वी अशीच एक बैठक आटोपल्यानंतर त्यांना तेथून मुंबईला यायचे होते. आम्ही एकत्र आलो. ते आमच्या घरी आले. त्यांनी चहा-पाणी घेतले आणि नंतर ते मुंबईला गेले. त्यांच्या मनात रामशेठ ठाकूर कुठल्या पक्षात आहेत, काय आहे हा विचार कधी आला नाही. कुणाबरोबरच त्यांचे असे काही नव्हते. सर्वांना योग्य मार्गदर्शन कुठे मिळेल तर गणपतराव देशमुख यांच्याकडे, अशी आमची प्रत्येकाची श्रद्धा होती. असा चांगला, ज्येष्ठ नेता गेल्याने अतिशय दु:ख होत आहे. त्यांना चिरशांती लाभो आणि या दु:खातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!      

-लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार

गणपतराव देशमुख हे शेकापचे ज्येष्ठ नेते होते. पश्चिम महाराष्ट्रासारख्या प्रगत विभागातील दुष्काळी भागाचे ते नेतृत्व करीत होते. आपल्या विभागात सिंचनाच्या पुरेशा योजना मिळवण्यासाठी आणि मतदारसंघातील नागरिकांचे जीवनमान उंचावे यासाठी अविरत झटणारे ते नेते होते. विधानसभेत होणार्‍या प्रत्येक चर्चेत भाग घेताना आपल्या परिसरातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी ते आग्रही असत. त्यांची राहणी साधी होती. सर्वसामान्यांबद्दलचा कळवळा त्यांच्या देहबोलीतून प्रकट व्हायचा. विधानसभेतील त्यांचा अनुभव व अभ्यास याबद्दल सर्वांनाच आदरयुक्त दरारा होता. त्यामुळे त्यांच्या जाण्याने केवळ त्यांच्या पक्षाची अथवा मतदारसंघाचीच हानी झालेली नसून संपूर्ण महाराष्ट्राची हानी झाली आहे. महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेबद्दल समर्पित भावनेने काम करणारी पिढी आता हळूहळू काळाच्या पडद्याआड जात आहे. अशा वेळी या व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा आणि आदर्शवादी विचारसरणीचा वारसा कसा पुढे नेता येईल याचा विचार सर्व पक्षांच्या नेतृत्वाने करण्याची आवश्यकता आहे.

-आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष, उत्तर रायगड जिल्हा भाजप

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply