खालापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील चौक, लोधिवली, तुपगाव आणि आसरे या चार ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या 16 ऑक्टोबर रोजी होणार असून, या निवडणुकीत भाजप विरूध्द महाविकास आघाडी असा सामना होत आहे. चौक, लोधिवली, तुपगाव आणि आसरे या चारही ग्रामपंचायती गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात होत्या. या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ एक वर्षापूर्वीच संपला असून आता तेथे येत्या 16 तारखेला निवडणुका होत आहेत. या चारही ग्रामपंचायती उरण विधानसभा मतदार संघाला जोडल्या आहेत. या विधानसभेचे नेतृत्व भाजप आमदार महेश बालदी हे करीत आहेत. त्यामूळे या चारही ग्रामपंचायतींची निवडणूक चुरशी झाली आहे. चौक ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचासह अठरा उमेदवार मैदानात आहेत, तिथे शिवसेना (महाविकास आघाडी) व भाजप अशी थेट लढत आहे. शिवसेनेचे माजी आमदार मनोहर भोईर यांचे विश्वासू सहकारी विभाग प्रमुख सुधीर ठोंबरे यांची कन्या रितू सुधीर ठोंबरे आणि भाजपचे गणेश कदम यांची पत्नी गायत्री गणेश कदम यांची थेट सरपंच पदासाठी सरळ लढत होत आहे. उरण विधानसभा मतदार संघात चौक ग्रामपंचायत येत असल्याने आमदार महेश बालदी या ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचारात उतरले असून, ते भाजप उमेदवारांसाठी मते मागत आहेत. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्वीय सहाय्यक हेमंत माने हेदेखील प्रभाग क्र.3 मधून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे भाजप नेते यावेळी चौक ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात दिसणार आहेत.