मराठवाडा आणि नगर भागातून येणारी वाहने पुणे-मुंबई महामार्गाने प्रवास करतात.त्यावेळी वाहतुक कोंडी सातत्याने होत असताना या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने शिरूर-कर्जत या नवीन राज्यमार्गाचे सर्वेक्षण सुरू केले आहे.दरम्यान,140 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाच्या सर्वेक्षण कामासाठी दोन कंपन्यांनी निविदा स्वीकारल्या असून त्या कंपनीवर वन जमिनीच्या परवानग्या मिळविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे अशी माहिती पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य आणि नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी दिली आहे.पश्चिम महाराष्ट्रातील भाजीपाला,दुग्ध उत्पादने यांना मुंबईत जाण्यासाठी जवळचा आणि वाहतूक कोंडीतून सुटका करणारा हा मार्ग ठरेल असा शासनाला विश्वास आहे.
1980च्या रस्ते विकास आराखड्यात उरण-पनवेल-नेरळ- कशेळे- शिरूर असा राज्यमार्ग घोषित केला होता.या महामार्गाचे काम वन जमिनिमुळे आणि भीमाशंकर अभयारण्य मधील अतिसंवेदनशील जमिनीमुळे रखडले आहे.भीमाशंकर घाटातील रस्त्याचे काम पुढे जात नसल्याने राज्य शासनाने उरण-पनवेल- कर्जत-वांद्रा पाईट शिरवली मार्गे राजगुरूनगर आणि पुढे पाबळ मार्गे शिरूर असा नवीन मार्ग अस्तिवात येणार आहे. रस्ता तयार करण्याच्या सर्वेक्षणाच्या कामाला नुकतीच मंजुरी देण्यात आली असून सदर कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रकल्पाची महत्त्वाच्या बाब म्हणजे भीमाशंकर ऐवजी हा नवीन मार्ग कर्जत-शिरूर या नावाने ओळखला जाणार आहे. राज्य शासनाने केलेल्या सर्व्हेनुसार मराठवाड्यातून येणारी चाकण मार्गे तळेगाव लोणावळा अशी मुंबईकडे होत असते. त्यावेळी आधीच पुणे-मुंबई हायवे आणि एक्सप्रेसवेवर लोणावळा खंडाळा घाटात वाहतूक कोंडीच्या समस्येला सर्वाना सामोरे जावे लागते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवीन घाटाची आखणी करून त्याची निर्मिती करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.
140 किलोमीटरचा हा प्रस्तावित राज्यमार्ग असून मावळ तालुक्यातून 22 किलोमीटर तर खेड तालुक्यातील 72किलोमीटर उर्वरीत अंतर शिरूर तालुक्यामधील असे एकंदरीत 140 किलोमीटरचा हा रस्ता करण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे. सुरुवातीला 10 मीटरने या रस्त्याची रुंदी पूर्ण करण्यात येणार असून, भविष्यातील रस्त्यांची गरज लक्षात घेऊन 45 मीटर रुंदीने रस्त्यासाठी भूसंपादन केले जाणार आहे. साडेबारा कोटी रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली असून मोनार्च कन्सल्टंट आणि सर्वेअर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीची निविदा स्वीकारण्यात आली आहे. या सर्वेक्षण करणार्या कंपनीकडून नुसता आराखडा मंजूर करून घेण्यासोबत यातील फॉरेस्ट आणि नॉन फॉरेस्ट जमिनींच्या भूसंपादनाच्या विषयीच्या परवानग्या मिळवून देण्याची जबाबदारी सर्वेक्षण करणार्या कंपनीवर टाकण्यात आली आहे.याचा संपूर्ण आराखडा पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक केले जाणार असून त्यावेळी 140 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी किती खर्च येईल हे ठरणार आहे.त्यानंतर या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडून याची मंजुरी घेण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून मंजुरी घेण्याचे नियोजन पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य अभियंता दिलीप मेदगे यांनी स्पष्ट केले आहे.
आंबोली ते औंढे, कुडे, घोटवडी, धामणगाव शिरगाव असा 20 रस्ता बनविण्याचे काम सुरू आहे. सद्यस्थितीमध्ये पढरवाडी ते वांद्रे, विर्हाम ते आंबोली या अरुंद असलेल्या रस्त्याची रुंदी 10 मीटरची करण्याचे कामे महाराष्ट्र शासनाच्या बजेटमधून सुरू आहे. तसेच या भागातून जाणार्या या रस्त्यामुळे आंबोली, पाईट किवळे, शिरवली गावांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. पुणे-नाशिक महामार्गाला शिरूर येथे जोडला जाणार्या या महामार्गावर असलेल्या खेड तालुक्यातील पश्चिम भागाचा विकासाच्या वाटेवर येऊ शकतो.तर कर्जत तालुक्यातील सर्व रस्ता यापूर्वीच 10 मीटर रुंदीचा तयार आहे. जेमतेम साडेचार किलोमीटर लांबीचा रस्ता वन जमिनीतून जाणारा असल्याने तेथे रस्ता अस्तिवात नाही.
बारा ज्योतिलिंग पैकी एक असलेल्या भीमाशंकरला येणार्या पर्यटक, भाविकांना अत्यंत कमी अंतरातून भीमाशंकरला पोचता येईल. स्थानिकांना आपला शेतमाल विशेषता भात, कडधान्य, रानमेवा, करवंदे, जांभूळ तसेच हॉटेल व्यवसाय पर्यटनाला चालना मिळू शकते.
या राज्यमार्गासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत, त्याआधी कर्जत आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला जाणारा राष्ट्रीय महामार्ग बनविला जावा असा एक मत प्रवाह पुढे आला आहे. महाराष्ट्राचे असलेले नितीन गडकरी यांच्या कार्यकाळात रस्ते मंत्रालय यांच्याकडून भीमाशंकर अभयारण्य मधून राजमार्ग जाऊ शकतो. परंतु 1980 पासून राज्याच्या टोपोशीट मध्ये समाविष्ट असलेला रस्ता साकारत नसल्याने जो आधी होईल तो रस्ता आपला या न्यायाने शिरूर-कर्जत रस्ता मुंबईत जाण्यासाठी जवळचा मार्ग ठरू शकतो आणि त्यामुळे ही मागणी राज्य सरकारने जवळची केली आहे. दुग्ध व्यवसाय, उद्योग, भाजीपाला, फळे यांच्यासाठी हा पर्यायी मार्ग मुंबई गाठण्यासाठी जलद मार्ग ठरू शकतो.
वैशिष्ट्य
उरण-पनवेल-नेरळ-कशेळे-भीमाशंकर ऐवजी शिरूर-वांद्रे-राजगुरूनगर-कर्जत असा नवीन राज्यमार्ग प्रस्तावित 140 किलोमीटरचा असेल नवीन राज्यमार्ग
पहिल्या टप्प्यात 10 मीटर लांबीचा रस्ता बनविण्याचे उद्दिष्ट
भविष्याची गरज लक्षात घेऊन 45 मीटर रुंदीचे भूसंपादन
राज्यमार्ग रस्त्याच्या कामाचे सर्वेक्षण करण्यासाठी दोन कंपन्या नियुक्त
सर्वेक्षणची जबाबदारी घेणार्या कंपन्यांवर वन जमिनीचे परवाने आणण्याची जबाबदारी
सर्वेक्षण, परवानगी आणण्यासाठी साडेबारा कोटींची निविदा मंजूर
सर्वेक्षण नंतर आराखडा तयार झाल्यावर केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्रालयाची परवानगी घेतली जाणार
लोणावळा घाटातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवीन घाटमार्गाची निर्मिती
-संतोष पेरणे, खबरबात