Breaking News

मोटार मॅकेनिक टीमची पूरग्रस्तांना अनोखी मदत

खालापूर : प्रतिनिधी

खोपोली शहरातील मेकॅनिक शाहीद शेख यांनी आपल्या सहकारी मित्रांना सोबत घेऊन पूरग्रस्तांना अनोखी मदत केली आहे. त्यांनी पूरग्रस्त भागात पाणी आणि चिखलामुळे  बंद पडलेली वाहने निशुल्क दुरुस्त करून दिली. खोपोलीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि स्पेअरपार्ट दुकानदारांनी त्यांच्या संकल्पनेला हातभार लावला.

शुक्रवारी (दि. 30 जुलै) साधारणपणे 20 कुशल आणि 15 अकुशल मोटर मॅकेनिक बसने महाडकडे रवाना झाले. महाड शहारात येताच त्यांनी आपली भूमिका त्या ठिकाणी काही लोकांना सांगितली, मात्र हे कसली सेवा देणार? असा ग्रह करून त्यांना कोणी प्रतिसाद दिला नाही, मात्र जिद्द न हरता त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. त्यांची एकंदर तयारी पाहून सुरुवातीला एक-दोन मोटारसायकल रिपेअरसाठी त्यांना मिळाल्या आणि त्या त्यांनी अवघ्या काही मिनिटांत  सुरू करून दिल्या. त्यांच्या या सेवेची चर्चा कानोकान पसरली आणि बघता बघता गाड्यांची रीघ लागली. दिवसभरत शेकडो वाहने या टीमने दुरुस्त केली.

आपल्याकडचे नवे स्पेअर पार्ट लावून, ऑईल बदली  करूनही त्याचे पैसे नाकारताना पाहून महाडकर अचंबित झाले होते. बुडालेली मोटारसायकल रिपेअरसाठी दोन हजाराचा खर्च अपेक्षित होता म्हणून ती रिपेअर करण्यापेक्षा  भंगारात विकायला निघालेल्या व्यक्तीची मोटारसायकल या टीमने दुरुस्त करून दिल्यावर त्याच्या चेहर्‍यावरचे भाव टीमला मोठे समाधान देऊन गेले होते. काहींच्या गाड्या  सोसायटीच्या आवारातून ढकलत अणून त्यांनी दुरुस्त करून दिल्या. त्यांच्या प्रयत्नाला स्थानिक मॅकेनिकनीही सहकार्य केले. फक्त मोटारसायकल नव्हे, तर कारदेखील त्यांनी दुरुस्त करून दिल्या.

या सर्व टीमची खाण्यापिण्याची जबाबदारी त्यांच्या सोबत आलेल्या महिला कुटुंबीयांनी घेतली. हे मॅकेनिक एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पूरग्रस्तांसाठी खोपोली परिसरातून जमा केलेले जे साहित्य आणि धान्य होते ते गरजूंच्या घरी जाऊन वाटले. टीममधील महिलांनी काही घरांत जाऊन घरकामाला हातभार लावला. त्यांच्या या योगदानाबद्दल अनेकांनी आभार व्यक्त केले. त्यांच्या या अभूतपूर्व अभियानाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply