Breaking News

आयपीएल सामन्यांवर ऑनलाइन बेटिंग

नवी मुंबईत एकाला अटक; मुद्देमाल जप्त

नवी मुंबई : वार्ताहर
आयपीएलच्या सामन्यांवर ऑनलाइन बेटिंग लावणार्‍या एकाला गुन्हे शाखा पोलिसांनी नवी मुंबईतून अटक केली आहे. त्याच्याकडून बेटिंगच्या साहित्यासह दोन लाख 26 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोपरखैरणे येथील एका घरावर शुक्रवारी रात्री छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.
क्रिकेटचे सामने सुरू झाले की, त्यावर बेटिंग लावले जाते. या माध्यमातून लाखो रुपयांचा सट्टा लावला जात असतो. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या टी-20 क्रिकेट सामन्यांवर बेटिंग लावले जात आहे का याकडे पोलीस लक्ष ठेवून आहेत. याचदरम्यान कोपरखैरणे येथील एक व्यक्ती ऑनलाईन बेटिंग लावत असल्याची माहिती गुन्हे शाखा पथकाला मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहाय्यक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांच्या पथकाने कोपरखैरणे सेक्टर 8 येथील सुयश स्वराज सोसायटीतील घरावर शुक्रवारी रात्री छापा टाकला. या वेळी विजय खैरनार (39) हा बेटिंग लावण्यास इच्छुक असणार्‍या ग्राहकांना फोनवरून संपर्क साधून बेटिंगचे दर सांगत होता. तो बेटिंग लावण्यासाठी मोबाईलमधील एका अ‍ॅप्लिकेशनचा वापर करीत होता. यासाठी त्याला संबंधित अ‍ॅपचा आयडी कोनी पुरवला याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
आरोपी विजय खैरना याच्याकडून दोन मोबाइल, टीव्ही तसेच दोन लाख रुपयांची रोकड असा दोन लाख 26 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बेटिंग लावल्याप्रकरणी खैरनार याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

शेकापच्या धामणी आणि धोदानी गावातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांची रविवारी (दि.20)उमेदवारी …

Leave a Reply