नगरसेविका नेत्रा पाटील यांचे सिडकोला निवेदन
खारघर : रामप्रहर वृत्त
खारघर विभागातील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. खारघर प्रभाग 4 मधील पाण्याची समस्या अत्यंत गंभीर असून मागील दोन वर्षांपासून सदर प्रश्न प्रलंबित आहे. सिडको प्रशासनाने याबाबत गांभीर्य दाखवून येथील पाणी समस्या तातडीने सोडवावी. या मागणीसाठी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या शिष्टमंडळाने सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेतली.
खारघर प्रभाग क्रमांक 4मध्ये सुमारे एक लाख एवढी लोकसंख्या आहे, मात्र मागील दोन वर्षांपासून येथे पिण्याचे पाणी अतिशय कमी प्रमाणात मिळत आहे. प्रामुख्याने या विभागातील सेक्टर 13, 19, 20 आणि सेक्टर 21 मध्ये पाणी प्रश्न अतिशय गंभीर आहे. याबाबत सिडकोचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांना वारंवार निवेदन देऊन, पाठपुरावा करूनदेखील पाणी प्रश्न सुटला नसल्याची खंत नगरसेविका नेत्रा पाटील यांनी व्यक्त केली. अखेर शुक्रवारी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेऊन खारघरमधील पाणी प्रश्नांची गंभीरता मांडल्याचे नेत्रा पाटील यांनी सांगितले.
या वेळी समाजसेवक किरण पाटील, भाजप खारघर उपाध्यक्ष दिलीप पाटील, रहिवाशी संतोष नायर, अरुणा शेलार, रणजित चौधरी, गायकवाड आदी उपस्थित होते.
दरम्यान, खारघरमधील पाणी प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन शिंदे यांनी या वेळी दिले. खारघरमध्ये पाणी समस्या असताना जर पिण्याचे पाणी उद्यान किंवा बांधकाम ठिकाणी दिले जात असल्यास ते तातडीने बंद करून खारघरमधील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करावा, असे आदेश करण्याचे आदेश शिंदे यांनी या वेळी पाणीपुरवठा विभागाला दिले.