Breaking News

बेपर्वाईची किंमत

कोरोना विषाणूची साथ किती गंभीर आहे याबद्दल पुरेशी जागरुकता समाजाच्या सर्व स्तरांमध्ये अद्याप निर्माण झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. कित्येक लोकांना कोरोनाच्या महासंकटाबद्दल फारशी माहिती नाही. मास्क लावणे, वारंवार हात धुणे अशा सावधगिरीच्या क्रिया अनेकांना चक्क विनोदी वाटतात. कडक निर्बंध लादून सरकार अतिरेक करीत असल्याची भावना काही अर्धशिक्षित मध्यमवर्गीयांमध्ये दिसून येते.

करकचून मुसक्या आवळून ठाणबंद केलेल्या मस्तवाल जनावरासारखा अवघा समाज निर्बंधांनी जखडून ठेवणे ही निश्चितच सुखावणारी बाब नव्हे. किंबहुना, असे निर्णय अत्यंत नाईलाजाने आणि टोकाचे पाऊल म्हणूनच राज्यकर्त्यांना घ्यावे लागतात. कोरोना विषाणूने आपले पाश आवळायला सुरूवात केल्यानंतर अत्यंत तातडीने पावले उचलत केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने राज्या-राज्यांना मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली. त्यानुसारच सर्व ठिकाणी कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत व या विषाणूच्या कचाट्यात सध्या तरी न सापडलेल्या तमाम नागरिकांना निर्बंधांना सामोरे जावे लागत आहे. कोरोना विषाणूशी सुरू असलेल्या लढाईत आघाडीवर लढणार्‍या डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉइज आणि पोलीस यांना कृतज्ञतेचा सलाम करण्यासाठी आपापल्या घराची दारे न ओलांडता टाळ्या व थाळ्या वाजवून यथोचित निनाद करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यानुसार तसा प्रचंड निनाद देशभर दुमदुमला देखील. परंतु काही अतिउत्साही महाभागांनी रस्त्यावर उतरून एकत्र जमून कल्लोळ केला. तो बिलकुल अपेक्षित नव्हता. दुर्दैवाने या प्रकारांमध्ये काही स्थानिक नेते देखील सामील झाले. टीव्ही कॅमेर्‍यासमोर चमकण्याचा हव्यास अशा वेळी किती घातक ठरू शकतो हे सुजाण नागरिकांना वेगळे सांगण्याची गरज नाही. धक्कादायक बाब अशी की रविवारी संध्याकाळी कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर दुसर्‍या दिवशी रस्ते गर्दीने ओसंडून वाहू लागले. टोलनाक्यांवर शेकडो वाहने तुंबली. भाजीपाल्याच्या मार्केटांमध्ये तोबागर्दी उसळली. जणुकाही कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकली असल्याची भावना गर्दीच्या वागण्यावरून दिसत होती. या गर्दीकडे पाहून अखेर राज्यसरकारने राज्यभरात संचारबंदी लागू केली आणि कडक निर्बंध लादून लोकांना घरातच थांबवण्याची सक्ती केली. ही सक्ती म्हणजे कुठल्या प्रकारचा जुलूम नव्हे, तर आपल्याच स्वास्थ्यासाठी घेतलेली काळजी आहे याचे भान आपण सार्‍यांनी ठेवायला हवे. परंतु ही बेपर्वाई समाजात आली तरी कुठून? घरात थांबून राहण्याची व यथोचित काळजी घेण्याची आवाहने होत असताना लोक बेफिकीर का झाले? संचारबंदीसारखे अत्यंत कडक कलम असताना त्यातील नियमांचा भंग करण्याचे धाडस काही लोकांनी का केले? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. विलगीकरणाचा शिक्का मनगटावर मारून घरी पाठवल्यानंतर अनेक संशयित कोरोनाबाधित गावभर हिंडताना आढळले. क्वारंटाइन या शब्दाचा अर्थच मुळात त्यांना कळला नाही त्याचेच हे द्योतक म्हणावे लागेल. सोमवारच्या दिवशी तर आपापल्या गावी परतण्यासाठी लोंढेच्या लोंढे रेल्वेस्थानके आणि बसडेपोच्या दिशेने वळले. हे दृश्य छातीत धडकी भरवणारे होते. अशी ठेचाठेच गर्दी कोरोनाच्या भीषण हल्ल्याला निमंत्रण ठरेल याची तिळमात्र जाणीव देखील या प्रवाशांना नव्हती. अशाप्रकारची साथ कुणीही आजवर पाहिलेली वा अनुभवलेली नाही. त्यामुळे अज्ञानातूनच सर्वसामान्यांच्या या बेपर्वाईचा जन्म झाला आहे हे लक्षात घेऊन व्यापक जागरूकता मोहीम राबवणे गरजेचे आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply