अतिवृष्टीमुळे 22 जुलैच्या रात्री महाड शहरात पूर आला. त्या मागोमाग पोलादपूर तालुक्यातील देवनाळे व साखर सुतारवाडी आणि महाडमधील तळीये या गावी दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. अतिमुसळधार पावसामुळे सावित्री नदीला पूर येऊन महाड शहर, बिरवाडी, राजेवाडी, लाडवली, गांधारे पाले, बिरवाडी एमआयडीसी, दादली पूल, पोलादपूर तालुक्यातील माटवण, आकले, कालवली, केवनाळे, साखर सुतारवाडी या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. टोळ बु. येथे मुंबई-गोवा महामार्गावर सहा फुटापेक्षा अधिक पाणी आल्याने महाडकडे जाणारी व येणारी वाहतूक बंद झाली होती, तसेच पाचाड मार्गे जाणार्या रस्त्यावर दरड कोसळल्याने, पोलादपूर मार्गे रस्ता दरड कोसळल्याने व खचल्याने, तर म्हसळा, गोरेगाव, आंबेत, चिंभावे मार्गावरही पाणी आल्याने महाड येथे रस्ते मार्गाने पोहोचणे अत्यंत अवघड होते. सावित्री नदीने पात्र ओलांडल्याने व पाण्यास असणार्या प्रचंड वेगामुळे जलमार्गही धोकादायक झालेला होता. त्यामुळे अतिवृष्टी झाल्याने बचाव पथकांना मदतकार्य करण्यास अडथळा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी हवाई मदत पोहोचविण्यासदेखील अडथळा येत होता. त्यामुळे सूर्योदय झाल्याबरोबर माटवण राजेवाडी, बिरवाडी येथे अडकलेल्या नागरिकांना हवाई दलाच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. या दरम्यान नगरपालिका महाडचे पथक, महेश सानप यांच्या वाईल्डर वेस्ट अँडव्हेंचर वॉटर स्पोर्ट्स आणि साळुंखे रेस्क्यू ग्रुप यांनी स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने महाडमध्ये बचावकार्य तत्काळ सुरू केले आणि रेस्क्यू ऑपरेशनद्वारे नागरिकांची सुखरूप सुटका करून त्या सर्वांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले. स्थलांतरीत केलेल्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, महाड व डॉ. बाबासाहेब आंबडेकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, दगडूशेठ पार्टे विद्यालय, महाड येथे निवास, भोजन व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या, तर घरात अडकलेल्या नागरिकांसाठी घरोघरी जाऊन खाण्याचे पदार्थ व पिण्यासाठी पाणीवाटप केले. महाड तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारणची दोन पथके, राज्य आपत्ती निवारणची दोन पथके, नौदलाची दोन पथके, सागरी सीमा सुरक्षा दलाची दोन पथके, तसेच 12 स्थानिक रेस्क्यू टीममार्फत मदतकार्य सुरू करण्यात आले. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने महाडमध्ये तत्काळ धाव घेत पूरपरिस्थितीची पाहणी करून पूरबाधित नागरिकांचे आणि जनावरांचे स्थलांतरण करून त्यांना युद्धपातळीवर मदत पोहोचविणे, स्थलांतरित केलेल्या नागरिकांसाठी अन्नधान्य, औषध पुरवठा, वैद्यकीय सेवा सुविधा यासारख्या आवश्यक सर्व बाबी उपलब्ध करून देणे, जनावरांनाही आवश्यक पशूखाद्य आणि पाणी पुरविणे, अतिवृष्टीमुळे खंडित झालेली दूरध्वनी सेवा आणि विद्युत पुरवठा तत्काळ सुरू करणे, अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या पिकाचे पंचनामे करून त्याची माहिती तत्काळ विमा कंपनीस देणे इत्यादी प्रकारच्या मदत व बचावकार्यास सुरुवात केली. दरम्यान, महाड तालुक्यातील तळीये गाव दरड कोसळून उद्ध्वस्त झाले. 25 जुलै रोजी दरडीच्या ढिगार्यातून 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले. पाच जण जखमी अवस्थेत सापडले, तर बेपत्ता असलेल्या 31 जणांचा तीन दिवसांनंतरही शोध सुरूच होता. या नैसर्गिक आपत्तीत ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या वारसांना, तसेच जखमींना पहिल्या टप्प्यातील नुकसानभरपाईची रक्कम अदा केली. या वेळी प्रशासनाने या अतिविशिष्ट व्यक्तींच्या पाहणी दौर्याचेही यशस्वी नियोजन केले. पूरग्रस्त व दरडग्रस्त नागरिकांच्या जनजीवनास लवकरात लवकर पूर्वपदावर आणणे हे जिल्हा प्रशासनाचे ध्येय होते. आरोग्य, साफसफाई, पाणीपुरवठा इत्यादी अत्यावश्यक बाबींबर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी महाड नगर परिषदेस 50 लाख, तर पोलादपूर नगर पंचायतीसाठी एक कोटी निधी मंजूर झाला. सार्वजनिक ठिकाणचा कचरा हटविणे, मृतदेहांची विल्हेवाट लावणे, पूरग्रस्त क्षेत्रातून पाण्याचा निचरा करणे यासाठी देखील दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या निधीतून संबंधित काम योग्य प्रकारे होण्याच्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले. शहराच्या स्वच्छतेस प्राधान्य देण्यात आले. यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिकेकडून, तसेच जिल्ह्यातील नगरपालिका या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी महाड शहर तीन ते चार दिवसांतच स्वच्छ करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पूरबाधित नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी विविध कंपन्या, सामाजिक संस्था, स्वयंसेवक यांच्या वतीने महाड येथील पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य, कपडे, पाणी, औषधे इत्यादी जीवनाश्यक वस्तूंचे वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात आले. या प्राप्त झालेल्या वस्तुरूपी मदतीचे वितरण योग्य व गरजू व्यक्तीला, कुटुंबांना होण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ते नियोजन केले. पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या हद्दीत येणारा वाडा, कुंभरोशी, तसेच पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाटात दरडी कोसळून मार्ग बंद झाल्याने प्रतापगड परिसरातील जवळपास 35 गावांचा संपर्क तुटला होता. या गावकर्यांना रायगड जिल्हा प्रशासनाने जीवनाश्यक वस्तूंची मदत तातडीने पोहोच केली. संभाव्य साथरोगांचा धोका ओळखून या बाधित क्षेत्रात जिल्हा प्रशासनाकडून रोग निदान शिबिर, औषधोपचार, तसेच कोविड 19 अँटिजेन टेस्टची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रतिकुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, पाच लिटर केरोसीन, तसेच पाच किलो तूरडाळ मोफत देण्यात आली. महापारेषणने केलेल्या प्रयत्नांमुळे महाड शहराचा विद्युतपुरवठा चक्राकार पद्धतीने सुरू झाला, तर अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात काही रस्ते वाहून गेले, काही पूल वाहून गेले, काही साकव वाहून गेले, तर काही ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे, रस्ता खचल्यामुळे दळणवळणाचे मुख्य मार्ग बंद झाले होते, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांनी तत्काळ कार्यवाही करीत ते रस्ते वाहतुकीसाठी खुले केले. या दरम्यान तळीये गावाच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने गावकर्यांच्या संमतीने तळीये खालचीवाडीजवळ तात्पुरत्या पुनर्वसनासाठी आवश्यक कामांना सुरुवात केली. या नागरिकांसाठी टाटा, जेएसडब्ल्यू, नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल या कंपन्यांच्या मदतीने एकूण 24 कंटेनर हाऊस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, सहायक पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, प्रतिमा पुदलवाड, प्रशाली दिघावकर, अमित शेडगे, दत्तात्रेय नवले, डॉ. यशवंत माने, तहसीलदार अण्णाप्पा कन्नशेट्टी, गमन गावित, दिलीप रायण्णावार, इरेश चप्पलवार, सुरेश काशिद, प्र. तहसीलदार समीर देसाई, प्रियांका कांबळे, विजय तळेकर, विशाल दौंडकर, सतीश कदम, विक्रम देशमुख, कविता जाधव, पशुसंवर्धन विभाग उपायुक्त डॉ. सुभाष म्हस्के, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बंकट आर्ले, गटविकास अधिकारी दिप्ती देशमुख, सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. कैलास चौलकर, कार्यकारी अभियंता आर. के. बामणे, उपअभियंता, दिनेश पराते, सुनील बुर्ले, अरुण देवकाते, शिवलिंग उलागडे, नगरपालिका मुख्याधिकारी विराज लबडे, सुरेखा भणगे, किरण मोरे, मनोज उकिर्डे, राहुल इंगळे, माधुरी मडके, संतोष माळी, गणेश शेटे, दयानंद गोरे, जिल्हा कृषी अधीक्षक उज्ज्वला बाणखेले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल भुसारे, जिल्हा पोलीस अधीक्षक वायरलेस शाखेचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील, महाड एमआयडीसी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. खाडे, हॅमचे अमोल देशपांडे, दिलीप बापट यांच्यासह महसूल यंत्रणा, जिल्हा परिषद यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरणचे सर्व अधिकारी, कर्मचारी, अन्न व औषध प्रशासन यंत्रणा, वैधमापन यंत्रणा, नगरपालिका प्रशासन, स्वच्छता कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्था यांनी जनसामान्यांचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.
-मनोज शिवाजी सानप, रायगड जिल्हा माहिती अधिकारी