Breaking News

केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्रच!

पावसाची चाहूल लागली की बेडकांची डराव डराव ऐकू येऊ लागते.
काही बेडक्या अकारण फुगतात. त्याचे प्रत्यंतर महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज दिसतेच आहे.

जनमताचा धडधडीत अपमान करून उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कट्टर विरोधक राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या दावणीला बांधली. केवळ मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी जनमत लाथाडण्याचे पाप त्यांनी साडेतीन वर्षांपूर्वी केले. त्याचे फळ त्यांना अडीच वर्षांतच मिळाले. ठाकरे यांच्या कुटुंबकेंद्रित राजकारणाला कंटाळलेल्या चाळीस आमदारांनी ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केल्याने ठाकरे यांची खुर्ची गेली आणि शिंदे त्यावर विराजमान झाले. अर्थात, हा पराक्रम शिंदे यांना एकट्याच्या बळावर करता आलाच नसता. भारतीय जनता पक्ष त्यांच्या मागे ठामपणाने उभा राहिला म्हणूनच त्यांचा उठाव यशस्वी झाला. इतकेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेली कायदेशीर लढाई शिंदे यांना जिंकता आली कारण मोठमोठ्या वकिलांची आणि घटनातज्ज्ञांची फौज भाजपने त्यांच्यामागे उभी केली. वास्तविक भाजपकडील आमदारांची संख्या शिवसेनेपेक्षा जवळपास दुप्पट आहे. तरीही शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्रीपद शिंदे यांच्याकडे सोपवून देवेंद्र फडणवीस यांनी शिस्तबद्ध कार्यकर्त्याप्रमाणे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. वर्षभरातच भराभर निर्णय घेणारे गतिमान सरकार असा लौकिक शिंदे-फडणवीस सरकारला प्राप्त झाला. त्यामागे फडणवीस यांचा अनुभव आणि बुद्धिचातुर्य हेच आहे. असे असतानाही मंगळवारी सर्व दैनिकांच्या पहिल्या पानावर शिवसेनेतर्फे जी जाहिरात प्रसिद्ध झाली त्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. केंद्रात मोदी आणि राज्यात शिंदे असा संदेश देणारी ही जाहिरात महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारी ठरली. इतकेच नव्हे तर शिंदे यांची लोकप्रियता फडणवीस यांच्यापेक्षा काकणभर सरसच आहे अशी कुठल्याशा सर्वेक्षणातील आकडेवारी या जाहिरातीत देण्यात आली आहे. जाहिरातीतील हे दावे वाचल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना हसावे की रडावे हेच कळेनासे झाले. फडणवीस यांची लोकप्रियता कमी झाली असल्याचे सुचवणारी ही जाहिरात शिवसेनेतील अनेकांनाही पटली नसेल. या जाहिरातीत फडणवीसांचे छायाचित्र नाही तसेच हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचेही छायाचित्र नाही. त्यामुळे ही जाहिरात खरोखरच शिवसेनेनेच दिली आहे का असा प्रश्न अनेकांना पडला. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक नेत्यांनी या वादग्रस्त जाहिरातीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर शिंदे समर्थक नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी जाहिरातीत चुका असतील तर सुधारून घेऊ अशी नरमाईची भूमिका घेतली. कोल्हापूर येथे एका कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस एकत्र जाणार होते. परंतु सायनसच्या आजारामुळे फडणवीस यांनी कोल्हापूर दौरा रद्द केल्याने भिवया आणखीनच उंचावल्या. वास्तविक शिंदे-फडणवीस सरकारचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालले आहे. मोठमोठे निर्णय वेगाने घेतले जात असून परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकाला पोचला आहे. विकास कामे धडाधड पार पडत आहेत. भाजप आणि शिवसेना यांची महायुती ही जनतेच्या मनातलीच युती आहे. तिला तडे जावेत असे कोणालाच मनापासून वाटत नाही. भाजपसारखा बलाढ्य साथीदार नसता तर हे दिवस दिसले नसते ही वस्तुस्थिती शिंदे यांच्या समर्थकांनी लक्षात ठेवली पाहिजे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना पर्याय नाही ही खूणगाठ सर्वांनीच बांधून ठेवावी.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply