कर्जत : बातमीदार
तालुक्यातील चाफेवाडी येथे पोश्री नदीवर बांधण्यात आलेला पूल धोकादायक झाला आहे. या भागातील रस्तेसुद्धा खड्डेमय झाले आहेत. खांडस-नांदगाव रस्त्यावरील चाफेवाडी येथे 25 वर्षांपूर्वी पोश्री नदीवर पूल बांधण्यात आला होता. या पुलाची अवस्था सध्या खूपच खराब झाली आहे. पुलावर डांबर राहिले नाही आणि मोठे खड्डे पडून पुलाच्या लोखंडी सळ्या बाहेर दिसू लागल्या आहेत. मोठे वाहन जात असताना पूल हालतो, असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. चाफेवाडी, नांदगाव भागातील ग्रामस्थांना या पुलाची दुरुस्ती कधी होईल, याची प्रतीक्षा आहे. या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी या भागातील ग्रामस्थ करीत आहेत.
चाफेवाडी पूल नादुरुस्त झाला आहे. वाहन जात असताना हा पूल हालतो. लक्ष नाही दिले तर या पुलावर मोठा अपघात होऊ शकतो. मागणी करूनसुद्धा या पुलाच्या दुरुस्तीकडे सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.
-विश्वास परदेशी, ग्रामस्थ, चाफेवाडी, ता. कर्जत
चाफेवाडी पुलाची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मे 2021मध्ये बांधकाम विभागाकडे पाठवला आहे. पावसाळ्यानंतर पुलाच्या दुरुस्तीचे काम अपेक्षित आहे.
-प्रल्हाद गोपणे, उपअभियंता, बांधकाम विभाग, रायगड जिल्हा परिषद.