पनवेल ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा सातत्याने विकास व्हावा आणि बदलत्या शैक्षणिक गरजांनुसार शिक्षक व प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम व्हावी या उद्देशाने रयत शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा 2026 या विषयावर रायगड विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा संस्थेच्या कामोठे येथील रायगड विभागीय कार्यालय सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात झाली.
संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेला व्हाईस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, उपाध्यक्ष पी.जे. पाटील साहेब, जयश्रीताई चौगुले, सचिव विकास देशमुख, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, नवी मुंबईचे उपमहापौर व संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दशरथ भगत, नगरसेवक परेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षणातील गुणवत्ता वाढवण्यासाठी आवश्यक असलेले आधुनिक अध्यापन तंत्र, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धती, मूल्यमापनातील नव्या संकल्पना आणि शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या उपक्रमांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
अध्यक्षीय मार्गदर्शनात संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी रयत शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा 2026 या संकल्पनेविषयी सविस्तर माहिती देत शिक्षकांनी शिक्षण प्रक्रियेत नव्या कल्पना आत्मसात करण्याची गरज अधोरेखित केली. शिक्षण हे केवळ ज्ञान देण्यापुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे सांगून संस्थेच्या परंपरेला साजेशा गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
संस्थेचे सचिव विकास देशमुख, सहसचिव बंडू पवार, शिवलिंग मेनकुदळे, राजेंद्र मोरे यांनी गुणवत्ता विकास आराखड्याचे सादरीकरण केले. द्वितीय सत्रात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विभागीय स्तरावर गुणवत्ता विकासाच्या उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले, तर समारोपावेळी व्हाईस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनातून संस्थेची स्वावलंबन, त्याग व शिक्षण क्षेत्रात नवीन दिशा देणारी चळवळ उभी केली आहे, असे प्रतिपादन केले.
कार्यशाळेत उपस्थित शिक्षक व अधिकार्यांनी विविध मुद्द्यांवर आपले अनुभव मांडले आणि गुणवत्ता विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल याबाबत चर्चा केली. या संवादातून अनेक विधायक सूचना पुढे आल्या.
कार्यशाळेस संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य, लाईफ मेंबर, लाईफ वर्कर, प्राचार्य, मुख्याध्यापक व टेक्नोसॅव्ही शिक्षक उपस्थित होते. कार्यशाळेचे नियोजन आणि समन्वय विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे आणि सहाय्यक विभागीय अधिकारी विलास जगताप यांनी केले. सूत्रसंचालन सागर रंधवे यांनी केले, तर आभार तुषार म्हात्रे यांनी मानले.
Check Also
Gambling enterprises that have $5 Deposit 2026: Finest disco fever casino Minimum Put Casinos
Articles Disco fever casino – Greatest $5 Minimal Put Gambling enterprises Royal Vegas Local casino …
RamPrahar – The Panvel Daily Paper