Breaking News

नवी मुंबईत कोविड स्थिती नियंत्रणात

कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले; 85 टक्के खाटा रिक्त

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

गेली महिनाभर शंभरीवर स्थिर असलेला दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख आता घटला असून दैनंदिन रुग्ण 50 पेक्षा कमी मिळत आहेत. त्यात बरे होणारे रुग्ण अधिक असल्याने शहरातील कोरोनास्थिती नियंत्रणात आली आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या 708 पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या 6910 खाटांपैकी 5890 खाटा रिकाम्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण देशातच कमी झाल्याचे दिसत आहे, मात्र गेली दोन दिवसांत पुन्हा रुग्णवाढ सुरू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. असे असले तरी नवी मुंबईत मात्रा अद्याप चांगली परिस्थिती आहे. गेली महिनाभर दैनंदिन रुग्णसंख्या शंभपर्यंत होती ती कमी होत गेल्या आठवडाभरात 50 पेक्षा कमी झाली आहे. आठवडाभरात सोमवारी 20 ही अलीकडची सर्वांत कमी रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. दररोज सापडणारे रुग्ण कमी झाले असून बरे होणारे रुग्ण हे त्यापेक्षा अधिक असल्याने शहरात उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. शहरात सध्या 686 रुग्ण उपचाराधीन रुग्ण आहेत. यात 184 रुग्ण हे घरीच विलगीकरणात आहेत तर महापालिकेच्या कोरोना केंद्रात काही रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित रुग्ण हे शहरांतील खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. प्रत्यक्षात उपचार घेणारे रुग्णांची संख्या ही कमी असल्यामुळे कोरोना रुग्णांसाठी असलेल्या खाटा आता रिकाम्या झाल्या आहेत. महापालिकेच्या विविध कोरोना काळजी केंद्रे व रुग्णालयांत एकूण 6910 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी 5890 खाटा आता रिकाम्या आहेत. ही शहरासाठी दिलासा देणारी बाब आहे.

कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी इतर शहरांत वाढणारे रुग्ण व वर्तविण्यात आलेली तिसर्‍या लाटेची शक्यता पाहता महापालिका प्रशासनाने नवी मुंबईकरांना खबरदारीचे आवाहन केले आहे.

आठवडाभरातील दररोजचे नवे रुग्ण

27 ऑगस्ट :         52

26 ऑगस्ट :         53

25 ऑगस्ट :         50

24 ऑगस्ट :         38

23 ऑगस्ट :         20

22 ऑगस्ट :         51

21 ऑगस्ट :         49

20 ऑगस्ट :         51

19 ऑगस्ट :         62

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply