Breaking News

पर्यटकांची पावले आगरकोट किल्ल्याकडे

रेवदंडा ः प्रतिनिधी

रेवदंडा आगरकोट किल्ला, ऐतिहासिक काळातील पोर्तुगीजांचा अभेद्य बालेकिल्ला, आगरकोट सभोवातलची समुद्री तटबंदी आणि डोमिनिकन चर्च, फ्रान्सिस्कन चर्च, चौकोनी बुरूज आणि सातखणी बुरूज पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. आगरकोट किल्ल्याच्या वावव्येकडील बुरूजाजवळील लहान दरवाजाच्या आग्नेय 45.72 मीटरवर तटबंदीच्या पश्चिमेकडील भिंतींत पडलेल्या भगदाडासमोर 1534च्या सुमारास बांधलेल्या फ्रान्सिस्कन इमातीच्या मध्यभागी असलेल्या 6.09 मीटर चौकोनी आकाराच्या सातखणी बुरूजाच्या भिंतीचा सांगाडा पाहावयास मिळतो. पूर्वी त्याची उंची 29.26 मीटर इतकी नमूद केली असली तरी वरच्या बाजूने भिंती पडल्यामुळे उंची कमी झाली आहे. बुरूजालगत भोवताली सर्व इमारतीच्या भिंती पूर्णपणे पडल्या असून आजूबाजूस अर्धवट भिंतींचे अवशेष दिसतात. समुद्रमार्गे शत्रूंनी हल्ला केल्यास शत्रूवर करडी नजर ठेवण्यासाठी या सातखणी बुरूजाची बांधणी झाली असावी, असे म्हटले जाते. या सातखणी बुरूजाच्या वरील बाजूकडून दूरवर समुद्रकिनारी नजर जात असल्याने शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यास या सातखणी बुरूजाचा उपयोग केला जात असे. सध्या रेवदंडा मोठ्या बंदराकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावरून सातखणी बुरूजाकडे जाण्यासाठी मार्ग आहे. या ठिकाणी पर्यटक व पै-पाहुण्यांची नित्याची रेलचेल असते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply