कर्जत : प्रतिनिधी
भारताचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मृणाल गायकवाड यांच्या एंटरटेंन्मेंटने पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घेतलेल्या कार्यक्रमात माथेरान येथील हर्षा विनोद शिंदे (सध्या रा. महाबळेश्वर) ही मिस हेरिटेज इंडिया किताबाची मानकरी ठरली. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, तसेच अभिनेत्री हेमांगी कवी यांनी हर्षा हिला मिस हेरिटेज इंडियाचा मुकुट चढवून कौतुक केले. या स्पर्धेत देशभरातून एकूण 17 युवतींनी सहभाग घेतला होता.
आपल्या या यशामागे आई-वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे हर्षाने सांगितले, तसेच मेहनत हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे हर्षा सांगते. लेखन व पेंटिंग हा हर्षाचा छंद आहे. सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी जागतिक स्पर्धेचे नेतृत्व करण्याचा तिचा मानस आहे. हर्षा ही माथेरानच्या माजी नगसेविका वासंती जांभळे यांची नात आहे. त्यामुळे माथेरानमधून हर्षावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.