खोपोली : प्रतिनिधी
हवामान खात्याने रायगडला अतिवृष्टीबाबत ऑरेंज इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर खालापूरचे तहसीलदार चप्पलवार यांनी धोकादायक दरडप्रवण वाटणार्या बीड खुर्द आदिवासीवाडी आणि बौद्धवाडा या ठिकाणी रविवारी (दि. 29) भेट देत ग्रामस्थांना उपयुक्त सूचना केल्या.
रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज इशारा देण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने गाफील न राहता पुढील तीन दिवस सतर्कता बाळगावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत. त्यानुसार तहसीलदार चप्पलवार यांनी रविवारी खालापूर तालुक्यातील दरडी कोसळण्याची भीती असलेल्या बीड भागाला तातडीने भेट दिली. या वेळी त्यांनी नागरिकांसाठी सुरक्षित ठिकाणी निवारा केंद्र, त्यांचे स्थलांतर, त्यांच्यासाठी अन्नधान्याची पुरेशी व्यवस्था याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली.