खोपोली : प्रतिनिधी : महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. 18) पिंपरी-चिंचवड परिसरात दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात महायुतीचे मध्यवर्ती प्रचार कार्यालय पिंपरी येथून झाली, तर समारोप दापोडी येथे झाला.
मोरवाडीपासून सुरू झालेली ही रॅली पुढे गांधीनगर, अजमेरा, मोरवाडी, मोहननगर, संभाजीनगर, शाहूनगर, संभाजीनगर, केएसबी चौक, भक्ती-शक्ती चौक, संभाजी चौक, प्राधिकरण, आकुर्डी गावठाण, खंडोबा माळ, चिंचवड स्टेशन, भाटनगर, पिंपरी मार्केट, वल्लभनगर, कासारवाडी, दापोडी या मार्गावरून काढण्यात आली. रॅलीमध्ये महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह महायुतीचे घटक पक्षातील सर्व नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
महायुतीचा विजय असो, श्रीरंग बारणे आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, कोण आला रे कोण आला, महायुतीचा वाघ आला, फिर एक बार मोदी सरकार, अशा घोषणांच्या जयघोषात ही रॅली संपन्न झाली. रॅलीचा समारोप बोपोडी येथे झाला. आमदार लक्ष्मण जगताप आणि खासदार श्रीरंग बारणे यांचे मनोमीलन झाले आहे. यामुळे महायुतीमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. याचा प्रत्यय या रॅलीमध्ये आला. मावळ लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा निवडून देण्यासाठी मावळकरांनी कंबर कसली आहे.