Breaking News

द्रुतगती मार्गावरील आडोशी पट्टा ठरतोय जीवघेणा

अवजड वाहने ठरताहेत कर्दनकाळ

खोपोली : प्रतिनिधी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी पट्टा कार चालकांसाठी जीवघेणा बनला असून टँकर, ट्रेलर, कंटेनरसारख्या अवजड वाहनांच्या कचाट्यात सापडून अनेक निष्पाप बळी जात आहेत. सोमवारी द्रुतगती मार्गावर आडोशी भागात झालेल्या भीषण अपघातात निष्पाप तीन जणांचा नाहक बळी गेला होता. धोकादायक गॅस वाहतूक करणार्‍या टँकर चालकाचा बेदरकारपणा तीन जणांना मृत्यूच्या दारात घेऊन गेला तर टँकर चालकदेखील मृत्यूशी झुंज देत आहे.आडोशी भागात घडलेला या वर्षातील हा चौथा भीषण अपघात आहे.

खालापूर आणि खोपोली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पाच महिन्यात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पंधरापेक्षा अधिक बळी आणि पन्नास पेक्षा अधिक जण जखमी ही आकडेवारी द्रुतगती मार्गावरील प्रवास किती धोकादायक आहे याची जाणीव करून देणारी आहे.

घाट उतरताना हलक्या वाहनांसाठी पन्नास किमी प्रतितास तर अवजड मोठ्या वाहनांसाठी चाळीस किलोमीटर प्रतितास वेग मर्यादा आहे. परंतु आडोशी पट्ट्यात सर्रासपणे वेग मर्यादेचे उल्लंघन होते. याशिवाय लेनची शिस्तीचे पालन होत नसल्याने अपघातावर नियंत्रण मिळविणे अवघड बनले आहे. पहिली लेन अवजड वाहनासाठी, दुसरी हलक्या आणि तिसरी लेन ओव्हरटेकसाठी आहे. परंतु अवजड वाहनांकडून वेग मर्यादा आणि लेन शिस्तीचे सर्रास उल्लंघन केले जाते. मुंबईच्या दिशेने जाताना अमृतांजन पूलापासून ते खोपोली बाह्यमार्ग आणि खालापूर हद्दीपर्यंत द्रुतगती मार्गावर उतार यामुळे पोलीस यंत्रणेलासुद्धा शिस्त मोडणार्‍या वाहनांवर कारवाई करताना मर्यादा येतात.

आडोशी पट्ट्यातील अपघात कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या. एक लेन बंदचा प्रयोग, हाईट बॅरिकेड्स, बोरघाट पोलीस मदत केंद्र पथकाकडून अवजड वाहन चालकांसाठी सातत्याने मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन अशा उपाययोजना करण्यात आल्या. परंतु बेदरकारपणा आणि शिस्तीचा अभाव यामुळे जिवघेणे अपघात थांबण्याचे सध्यातरी चिन्ह नाहीत.

मिसिंग लिंक

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटाला पर्यायी मार्ग म्हणून मिसिंग लिंक तयार होत आहे. यामुळे मुंबई-पुणे अंतर आठ किलोमीटरने कमी होणार असून, अपघात आणि वीकेण्डला होणारी वाहतूक कोंडीची कटकट संपणार आहे. दरडीचा धोका मिसिंग लिंकवर नसेल. घाटाची वाहतूक कोंडीतून सुटका होवून अंतर कमी झाल्याने वीस ते पंचवीस मिनिटे जलद प्रवास होणार आहे. परंतु त्यासाठी आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

चौथ्या लेनचे काम प्रगती पथावर

बोरघाट ते खालापूर टोल नाका वाहतूक कोंडी तसेच अपघात नियंत्रणसाठी अतिरिक्त चौथ्या लेनचे काम प्रगती पथावर आहे. खालापूर टोल नाक्यापर्यंत चौथी लेन असणार आहे. डिसेंबरअखेर हे काम पूर्ण होणार असल्याने तो पर्यंत तरी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रवास करताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply