अलिबाग ः प्रतिनिधी
भारतीय शरीरसौष्ठव विश्व आता आगामी 12व्या जागतिक शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेसाठी पूर्ण ताकदीनिशी सज्ज होतोय. कोरोनाच्या संकटामुळे अनेकदा लांबणीवर पडलेली स्पर्धा येत्या 1 ते 7 ऑक्टोबरला उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात होत असून या स्पर्धेसाठी भारताचा 77 सदस्यीय चमू निवडण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्राच्या सचिन पाटील, सुजन पिळणकर, सुभाष पुजारीसारख्या तयारीतील खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
गेल्या वर्षापासून कोरोना महामारीमुळे 12वी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा अनेकदा पुढे ढकलण्यात आली. दिवसेंदिवस कोरोनाच्या गहिर्या होत असलेल्या संकटामुळे गतवर्षीच्या सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या, परंतु आता जागतिक शरीरसौष्ठव संघटनेच्या अथक परिश्रमानंतर उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात स्पर्धेची जागतिक दर्जाची तयारी सुरू करण्यात आली आहे. अनंत अडचणींवर मात करीत ही स्पर्धा होत असून या स्पर्धेच्या तयारीसाठीही खेळाडूंना फार कमी वेळ मिळाला होता. त्या वेळेतही खेळाडूंनी प्रचंड
मेहनत घेत स्पर्धेसाठी तयारी करण्याचे धाडस दाखविले. जागतिक स्पर्धेसाठी भारतातून मोठ्या संख्येने खेळाडू तयारी करीत असल्याची माहिती भारतीय शरीरसौष्ठव संघटनेच्या सरचिटणीस हिरल शेठ यांनी दिली.
स्पर्धेच्या आयोजनाबाबत साशंकता असल्यामुळे काही ओळखीची नावे निवड चाचणी स्पर्धेतून गायब होती. असे असले तरी काही खेळाडूंनी आपले सर्वस्व पणाला लावत स्पर्धेच्या तयारीसाठी स्वतःला झोकून दिल्याचे दिसून आले. त्यात अलिबागच्या सचिन पाटीलचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. अवघ्या तीन महिन्यांत सचिनने फिटनेस फिजीक गटासाठी स्वतःला तयार केले आहे, तसेच तो ऍथलिट फिजीक या प्रकारातही आपली पीळदार शरीरयष्टी दाखवणार आहे. त्याचप्रमाणे माजी मुंबई श्री विजेता सुजन पिळणकरही 85 किलो वजनीगटात आपले कसब पणाला लावणार आहे.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …