Breaking News

कोकणासह राज्यात जोर‘धार’

रायगडला रेड अलर्ट

मुंबई : प्रतिनिधी
हवामान खात्याने महाराष्ट्राला दिलेल्या अतिवृष्टीच्या इशार्‍यानुसार कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात काही भागांत पाणी साचले. जोरदार पावसाचा फटका मराठवाडा आणि विदर्भात बसला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस सक्रिय राहण्याचा अंदाज आहे.
कोकणात पावसाचा जोर रत्नागिरीतील चिपळूण आणि संगमेश्वरमध्ये अधिक आहे. चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे, तर संगमेश्वर तालुक्यातील गड नदीला पूर येऊन हे पाणी माखजन बाजारात घुसले. त्यामुळे व्यापार्‍यांचे नुकसान झाले आहे. अशातच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे गेल्या चार दिवसांत वेगवेगळ्या घटनांमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. बीडमध्ये चार, नांदेडमध्ये तीन, औरंगाबादेत दोन आणि हिंगोली, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर 664 लहानमोठी जनावरे दगावली आहेत. याशिवाय 41 घरांची पडझड झाली आहे.
मुरूडमध्ये अनेक घरांत शिरले पाणी, बोटी बुडाल्या
मुरूड : मुरूड तालुक्यात अवघ्या 13 तासांत 475 मिलीमीटर एवढा विक्रमी पाऊस पडला असून या ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, तर दोन बोटी बुडाल्या. यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
रविवारी रात्री 8 वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस सलग दुसर्‍या दिवशी सुरूच राहिल्याने मुरूड शहरातील लक्ष्मीखार परिसरात अनेक घरांत पाणी घुसले. येथील परिसरात प्रत्येकाच्या घरात चार फूट पाणी शिरले होते. त्यामुळे लोकांना रात्र जागून काढावी लागली, तर शहरातील सुर्वे नाका, गोल बंगला परिसर व अन्य ठिकाणीही पाणीच पाणी होते.
याशिवाय उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील खारीक वाडा, वाळवंटी, उसरोली, खारदौडकुले, आदाड या भागांतील घरात पाणी शिरले होते. आदाड येथील गणपती मंदिरात चार फूट पाणी होते. लोकांच्या घरात पाणी शिरल्याने जीवनोपयोगी वस्तूंचे नुकसान झाल्याची माहिती उसरोली ग्रामपंचायतीचे सरपंच मनीष नांदगावकर यांनी दिली. या भागात जास्त पाऊस पडल्यावर नेहमीच घरात पाणी शिरण्याचे प्रमाण वाढले आहे, तरी महसूल प्रशासनाने या भागाची पाहणी करून असे का घडतेे यासाठी ठोस उपाययोजना करून येथील ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुरूड शहराजवळ असणार्‍या एकदरा पुलाजवळ सर्व मच्छीमार आपल्या बोटी दोरीच्या साह्याने बांधून ठेवत असतात, मात्र रात्रीच्या वेळी अचानकपणे पावसाचा वेग वाढल्याने एकदरा खाडीतील पाण्यात प्रचंड प्रमाणात वाढ होऊन चार बोटींचे दोरखंड तुटले. यातील दोन बोटी बुडाल्या, तर दोन बोटी महत्प्रयायाने किनार्‍याला आणण्यात आल्या.
पावसामुळे साळाव-मुरूड रस्त्यावर दरड कोसळली. त्यामुळे काही तासांसाठी वाहतूक बंद झाली होती. याबाबतची माहिती महसूल प्रशासनाला मिळताच साळाव येथील जेएसडब्ल्यू कंपनीकडून जेसीबी घेत येथील मलबा हटवण्यात आला.
बोर्ली बाजारपेठही गेली पाण्याखाली
रेवदंडा ः मुसळधार पावसामुळे डोंगरातून वाहून आलेल्या पाणी व मातीमुळे बोर्ली बाजारपेठ उद्ध्वस्त होऊन व्यापारी वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे साळाव चेकपोस्ट येथे रात्री दरड कोसळली, तर येसदे ते शिरगाव रस्त्यावरही पाणी व माती यांचा चिखल तयार होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.
मुरूड तालुक्यातील येसदे, साळाव, सुरई डोंगर भागात सोमवारी रात्री अतिवृष्टी झाल्याने हे पाणी मातीसह शिरगाव ते बोर्ली या मुख्यः रस्त्यावर प्रचंड वेगात येऊन चिखलाचे साम्र्राज्य निर्माण झाले होते. याचा फटका बोर्ली बाजारपेठेला बसला. या ठिकाणी अंदाजे सहा फुट पाणी घुसले होते. त्यातच परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याने आणि मोबाइल टॉवरचा संपर्क तुटल्याने बाहेरील लोकांशी संपर्क करणे कठीण झाले होते. मंगळवारी पहाटे चार ते पाच वाजता पाऊस उघडला, पण डोंगरातून पाणी व मातीचे मिश्रण दुपारी 12 वाजेपर्यंत येणे सुरू होते. त्यामुळे या मुख्य रस्त्याने वाहतूक करणे तारेवरची कसरत करण्यासारखे होत होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply