Breaking News

आरोग्याचा श्रीगणेशा

काळोख्या रात्री अवघड वाटेवर मिणमिणत्या प्रकाशात एकेक पाऊल सावधपणे पुढे टाकत वाटचाल करावी तसे सारे जग तिळातिळाने पुढे सरकत असल्याचा भास होतो. अद्यापही अनिश्चिततापूर्णच भासणार्‍या वातावरणात पुन्हा एकदा गणपती बाप्पा आपल्या घरी आला आहे. त्याचे श्रद्धापूर्वक स्वागत करायलाच हवे. संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया या ओळी त्यामुळेच आता अधिक प्रत्ययकारी वाटतात.

गणेशोत्सवाच्या तोंडावर सरकारने नवीन नियमावली जाहीर करून कोरोनाविषयक निर्बंध थोडे कडक केले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाचा झगमगाट यंदाही थोडा उणावणार हे नक्की. गेल्या वर्षी भाद्रपदामध्ये गणपती बाप्पा आले होते, तेव्हा कोरोनाची पहिली लाट शिखराला पोहोचली होती हे विसरता येणार नाही. यंदा दुसरी लाट किंचित ओसरल्याचे दिसत असले तरी बेसावध राहून चालणार नाही. पुरेशी आणि योग्य काळजी घेऊन बाप्पाचे स्वागत करायला काहीच हरकत नाही. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी सज्ज होत असल्याची हाकाटी सरकार आणि प्रशासन कितीही उठवत असले तरी सज्ज व्हायचे आहे ते आपल्यालाच, हे लोकांनी लक्षात घ्यायला हवे. तिसरी लाट येऊच नये म्हणून सर्वांनीच एकत्रित प्रयत्न करायला हवेत. तशी बुद्धी गणरायाने सर्वांना द्यावी ही प्रार्थना आहे. सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीचा अवघा भर सार्वजनिक गणेशोत्सव मर्यादित स्वरुपात साजरा करण्यावर दिसतो. प्रत्यक्षात राज्यात घरोघरी गणेशोत्सव साजरा करणार्‍यांची संख्याही मोठी असल्याने ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये गेले काही दिवस मोठी गर्दी होताना दिसते आहे. गेल्या वर्षी या सुमारास परिस्थिती अधिक बिकट असल्यामुळे बहुतेकांनी खूपच आटोपशीर स्वरुपात घरगुती गणेशोत्सव साजरा केला होता. त्यामुळेच की काय, यावेळी लोकांचा उत्साह उधाणला आहे. खरेदीपासून एकमेकांना निमंत्रणे देण्यापर्यंत बहुतेकांचे आसपासच्या कोरोना संबंधित परिस्थितीकडे दुर्लक्ष होते आहे. अर्थात, सरकारकडून जाहीर होणारी कोरोना संबंधी आकडेवारीही कधी चाचण्या वाढवल्या, कधी चाचण्या कमी केल्या याने प्रभावित होत असल्यामुळे लोक सध्या त्याकडे फारसे लक्ष देईनासे झाले आहेत. निर्बंधाइतकीच खरे तर जनजागृतीची गरज आहे. नेमक्या कुठल्या गोष्टी टाळाव्यात, लसीकरणानंतरही लागण कशी होऊ शकते, लस घेतलेलेही इतरांकरिता संसर्गाचे वाहक असू शकतात आदी बाबींची माहिती अद्याप सर्वसामान्यांपर्यंत फारशी पोहोचलेलीच नाही. बाकीचे सारे व्यवहार सुरू झाल्यामुळे बाहेर पडणारे लोक सणासुदीच्या दिवसांत घरी बसून राहतील अशी अपेक्षा करणेच अव्यवहार्य आहे. गणेशोत्सव साजरा करताना स्वत:च्या आणि इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने लोकांनी काय दक्षता घ्यावी यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्याची जबाबदारीही आपलीच आहे हे सरकारने ध्यानात घेण्याची गरज आहे. निव्वळ सण साजरे करण्यावर निर्बंध घालण्याऐवजी अन्य प्रलंबित निर्णयही सरकारने घ्यावेत. तशी बुद्धी गणरायानेच राज्यातील सत्ताधार्‍यांना द्यावी असे साकडे आता लोकांनीच घालण्याची गरज आहे. गेली जवळपास दीड वर्षे शाळा आणि महाविद्यालये बव्हंशी बंद आहेत. शिक्षणविषयक बहुतेक सारे व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन सुरू असले तरी त्यालाही काही मर्यादा आहेत. पुन्हा एकवार शाळेची घंटा घणघणावी आणि विद्यालयांच्या प्रांगणांमध्ये गणवेषातील बाळगोपाळांचा किलबिलाट व्हावा असे सर्वांनाच वाटते. भक्तांची ही इच्छा बुद्धिदात्या श्रीगणेशाने लवकर पूर्ण करावी हीच त्याच्या चरणी प्रार्थना.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply