भाजपचे वेट अॅण्ड वॉच
बेंगळुरू : वृत्तसंस्था
कर्नाटकात निर्माण झालेल्या राजकीय पेचामुळे काँग्रेस-जेडीएस सरकार अडचणीत आले आहे. जर 13 आमदारांचा राजीनामा स्वीकारला गेला तर कुमारस्वामी सरकार अल्पमतात येईल. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामीदेखील अमेरिकेतून भारतात परतले आहेत. दिल्लीहून विशेष विमानाने ते बेंगळुरूत पोहचत आहेत. त्यांनी पक्षनेत्यांची सायंकाळी तातडीची बैठक बोलावली आहे. काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची बैठक 9 जुलै रोजी होणार आहे. दरम्यान, भाजपची या संपूर्ण घटनाक्रमावर बारीक नजर आहे. सत्तास्थापनेबाबत विचारता, आमदारांच्या राजीनाम्यावर अध्यक्षांच्या निर्णयानंतर भाजप पुढील निर्णय घेईल, असे भाजपचे ज्येष्ठ नेते येड्डीयुरप्पा यांनी म्हटले आहे. काँग्रेस-जेडीएसच्या 13 आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे 224 आमदार असलेल्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेस-जेडीएसकडे केवळ 105 आमदार उरले आहेत तर भाजपचेही 105 आमदारच आहेत. या 13ही आमदारांनी राजीनामा मागे न घेतल्यास सरकार अल्पमतात येईल. मंगळवारी विधानसभेत या आमदारांच्या राजीनाम्यावर विचार करण्यात येईल.
राजीनामा दिलेले आमदार मुंबईत
स्थापनेपासूनच दोलायमान स्थितीत असलेले कर्नाटक सरकार संकटात सापडले आहे. शनिवारी सत्ताधारी काँग्रेसच्या 8 आणि जेडीएसच्या तीन आमदारांनी राजीनामा दिला. गेल्या काही महिन्यात सत्तारूढ काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडीच्या 13 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत. हे राजीनामे स्वीकारल्यास आघाडीचे संख्याबळ 103वर खाली येईल. त्यामुळे काँग्रेसचे 69 व जनता दलाचे 34 सदस्य राहतील. दरम्यान, शनिवारी राजीनामा देण्यार्या आमदारांपैकी 10 आमदार मुंबईतील एका हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.
हे तर रणछोड गांधी
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच कर्नाटकमधील 11 आमदारांना आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने तिथे पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत, काँग्रेसमधील या परिस्थितीवरून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. राहुल गांधी हे रणछोड गांधी बनले आहेत. ते मैदान सोडून पळाले आहेत, असे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.