Breaking News

कळंबोली सर्कल घेणार मोकळा श्वास

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अधिकार्‍यांना सूचना

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल-उरण परिसरात असलेले विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि त्या पार्श्वभूमीवर अत्यंत वर्दळीचे असलेले कळंबोली सर्कल विकसित करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीची दखल घेऊन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी कळंबोली सर्कलचा विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून मंगळवारी (दि. 7) बैठक आयोजित केली होती. कळंबोली सर्कलच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नेमा, असा सल्ला त्यांनी सिडको आणि इतर यंत्रणांना दिला आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली ते पनवेल-उरण-जेएनपीटीकडे जाणार्‍या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. पनवेल-उरण ते मुंबई-ठाणेकडून ही वाहतूक जेएनपीटी कडे ये-जा करीत असताना अवजड कंटेनर, प्रवासी वाहतूक कळंबोली एमजीएम सर्कल येथून 24 तास मार्गक्रमण करीत असतात, त्यामुळे कळंबोली सर्कल हे ठिकाण रहदारीचे आणि महत्त्वाचे जंक्शन आहे.  आणि या कारणास्तव, वाहतूक कोंडीची समस्या नेहमीच कळंबोली एमजीएम जंक्शन परिसरात भेडसावते आणि कधी कधी तर तासन्तास ‘ट्रॅफिक जाम’ होतो, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात इंधन आणि वेळ वाया जाते. त्यामुळे वाहतूक कोंडीतून पनवेलकरांची मुक्तता करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली होती. त्या विनंतीनुसार मंगळवारी दिल्लीत बैठक झाली.
जेएनपीटी आंतरराष्ट्रीय बंदरामुळे उरण, पनवेल परिसरात अवजड वाहतूक ही डोकेदुखी ठरली आहे. याचा सर्वाधिक परिणाम वेगवेगळे रस्ते एकत्र येणार्‍या कळंबोली सर्कलवर झाला आहे. मुंबईहून पुणे, पनवेल, अलिबाग, गोवा दिशेने जाणारी वाहतूक ठाणे आणि मुंब्र्याहून जेएनपीटी, पुणे, अलिबागच्या दिशेने जाणारी वाहतूक या सगळ्यांसोबत स्थानिक वाहनचालकांना दररोज ये-जा करण्यासाठी कळंबोली सर्कल पार करावे लागते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमाने उड्डाण घेऊ लागल्यानंतर मुंबईतील ‘एअर ट्रॅफिक’ कमी होईल, मात्र नवी मुंबईतील रस्त्यावरील कोंडी वाढू नये, या पार्श्वभूमीवर कळंबोली वाहतूक सर्कल विकसित करणे आवश्यक असणार आहे. जेएनपीटी, सिडको आणि राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने एकत्र येऊन प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या सीमाभागातील रस्ते विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामधील पॅकेज 4पर्यंतची कामे पूर्ण झाली असून पॅकेज 5मध्ये कळंबोली सर्कल आणि विमानतळाच्या वहाळ बाजूकडील ‘एग्झिट’वर रोटरी प्रकारचे चक्राकार बेट तयार करण्याचे प्रस्तावित आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिल्लीत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, सिडको, जेएनपीटी आणि एनएचएआयचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सध्या असलेल्या सल्लागारासोबत आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार घेऊन पुढील 20 वर्षे पुन्हा नूतनीकरणाची गरज लागणार नाही, असे नियोजन करण्याचा सल्ला गडकरी यांनी उपस्थितांना दिला. कळंबोली येथे बेट विकसित करताना सिडकोच्या जागेची गरज लागणार असल्यामुळे सिडकोने जागा इतर कारणांसाठी न देता यासाठी राखीव ठेवावी, अशा सूचनादेखील दिल्या.  लवकरच पनवेलकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणार असल्याचे नामदार नितीन गडकरी यांनी बैठकीत सांगत पनवेलकरांना मोठा दिला आहे.

दिल्लीत झालेल्या बैठकीत आम्ही कळंबोली सर्कलच्या कोंडीची कहाणी सांगण्यापूर्वीच ना. नितीन गडकरी यांनी अधिकार्‍यांना सर्कलवर होणार्‍या कोंडीची माहिती दिली. त्यामुळे आम्हाला माहिती सांगण्याची गरजच पडली नाही.
-प्रशांत ठाकूर, आमदार

रोटरी प्रकारचे सर्कल
जेएनपीटी बंदराकडे जाणारी अवजड वाहतूक, विमानतळावरून थेट पुण्याकडे जाणारी वाहतूक एकमेकांना अडथळा न करता थेट मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर जाता येईल, यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘रोटरी’ प्रकारचे सर्कल विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात आणखी भविष्याचे नियोजन करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागाराचा सल्ला घेऊन पुन्हा बैठक घेतली जाणार आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply