पनवेल : वार्ताहर
स्वच्छ भारत सर्वेक्षणांमध्ये पनवेल शहर हे कचराकुंडी मुक्त शहर असेल यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. नगरसेवक विक्रांत पाटील हे आपला प्रभाग सुंदर व स्वच्छ असावा यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडे प्रयत्न करीत आहेत. त्याअनुषंगाने नुकतेच प्रभाग क्रमांक 18मधील हॉटस्पॉट ठरत असलेली ठिकाणे आशियाना कॉर्नर, विरुपाक्ष हॉल, नवीन कोर्ट आणि शांताबाई गाडगे मार्ग येथे स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. या सर्व ठिकाणाची सफाई करून घेण्यात आली व नागरिकांना या जागी कचरा टाकू नये, असे आवाहन नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या वतीने करण्यात आले. जमा झालेला ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून घंटागाडीमध्ये टाकावा, अशी विनंतीही येथील नागरिकांना करण्यात आली. नागरिकांनी सुद्धा या उपक्रमाला त्यांचा सहभाग राहील असे सांगितले. आपल्या पनवेल शहराला स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल व कचराकुंडी मुक्त शहर करण्याकरीता नागरिकांनी सहकार्य करावे व ओला, सुका कचरा आणि जैविक कचरा हे तिन्ही वेगळे करून ठेवायची सवय सर्व पनवेलकरांनी अंगीकृत करून घ्यावी जेणेकरून स्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये आपले शहर मानांकित होईल, असे आवाहनही विक्रांत पाटील यांनी केले.