रायगड जिल्ह्यातील बालकांमध्ये असलेले कुपोषण कमी करण्यासाठी अलिबाग या जिल्हा मुख्यालयी बालउपचार आणि पुनर्वसन केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून चालवले जाते. जिल्ह्यातील जास्त कुपोषण हे कर्जत तालुक्यात यापूर्वी दिसून आले असल्याने स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि कुपोषण कमी करण्यासाठी काम करणार्या गाभा समितीच्या शिफारशीनुसार एप्रिल 2021 मध्ये कर्जत येथे कुपोषित बालकांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी 10 बेडची क्षमता असलेले केंद्र मंजूर झाले आहे, मात्र हे पुनर्वसन केंद्र म्हणजे एनआरसी सुरू होण्यास मुहूर्त अद्याप येताना दिसत नाही, त्यामुळे तालुक्यातील 120 सॅम आणि मॅममधील कुपोषित बालकांवर उपचार वेळेवर होत नाहीत.
रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक कुपोषण आतापर्यंत कर्जत तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात आढळून आले आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील कुपोषण निर्मूलनासाठी काम करणार्या दिशा केंद्राकडून सातत्याने कर्जत तालुक्यात रायगड जिल्ह्यातील दुसरे बाळ उपचार आणि पुनर्वसन केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात होती. अलिबाग येथे असलेले बाळ उपचार आणि पुनर्वसन केंद्र म्हणजे एनआरसी हे कर्जत तालुक्याच्या ठिकाणापासून 95 किलोमीटर अंतरावर आहे. त्यात कर्जत तालुक्यातील कुपोषित बालके ही जास्त प्रमाणात आदिवासी समाजात आढळून येत असतात आणि त्या आदिवासी पालकांना आपल्या पाल्यांना कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातून अलिबाग येथे जाणे आणि तेथे आपल्या बालकाला उपचार केंद्रात दाखल करून त्यांच्यावर 21 दिवस थांबून उपचार घेणे शक्य नाही, त्यात ही आदिवासी कुटुंबे प्रामुख्याने दररोज मजुरीसाठी घराबाहेर पडतात आणि त्यातून मिळणारा रोजगार यातून आपले घर चालवतात. त्यामुळे अशा कुपोषण ग्रस्त बालकांना घेऊन अलिबाग येथे जाऊन राहायला हे आदिवासी पालक नकार देतात. परिणामी कर्जत तालुक्यातील कुपोषण कमी होणे तसे शक्य होत नाही.
त्यामुळे दिशा केंद्र या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते अशोक जंगले यांनी अनेक वर्षे शासनाच्या गाभा समितीत काम करताना प्रथम आरोग्य विभागाला आणि नंतर राज्याचे राज्यपाल यांना कुपोषण प्रश्नी कर्जत तालुक्याच्या आदिवासी भागात एनआरसी का आवशयक आहे हे पटवून देत होते. त्यामुळे एप्रिल 2021 मध्ये राज्य शासनाने कर्जत येथे रायगड जिल्ह्यातील दुसरे बालउपचार आणि पुनर्वसन केंद्र सुरू करण्याला परवानगी दिली आहे. त्यानंतर कोरोनाचा काळ असताना सुद्धा रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने आणि तालुक्याच्या तत्कालीन प्रांत अधिकारी वैशाली परदेशी यांनीदेखील एनआरसी कुठे असावी याबाबत कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाहणी करून जागा निश्चित केली होती, तर कर्जत तालुक्यातील कुपोषण कमी करण्यासाठी कर्जत येथे आरोग्य विभागाने एनआरसी मंजूर केली आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व स्टाफची नेमणूक देखील केली. त्यातील बालरोगतज्ज्ञ हे कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आहेत. त्याच वेळी दोन आरोग्य सेविका, दोन परिचारिका, एक आहार विशेषज्ञ आणि एक आचारी यांच्या नेमणुका होऊन हे सर्व कर्जत उपजिल्हा रुग्णालयात एनआरसीसाठी रुजूदेखील झाले आहेत. सर्व स्टाफ उपलब्ध असताना आणि एनआरसीसाठी पुरेशी जागा कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असताना कर्जत तालुक्यातील कुपोषण कमी करण्यासाठी आवश्यक असलेले बालउपचार आणि पुनर्वसन केंद्र अद्याप सुरू झाले नाही.
कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीत कोविडचे रुग्ण यांच्यावर उपचार करणारा वॉर्ड आहे, त्यामुळे वयाने लहान असलेल्या कुपोषित बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी महत्त्वाचे असलेल्या एनआरसीचे मुख्य केंद्र हे कर्जत उपजिल्हा रुग्णालयात वेगळ्या इमारतीत सुरू केले जाणार आहे. एनआरसीसाठी सध्या सुरू असलेल्या कोविड लसीकरण केंद्राच्या जागेची निवड स्थानिक आमदार महेंद्र थोरवे, तसेच जिल्हा शल्यचिकित्सक आणि प्रांत अधिकारी यांनी निश्चित केली आहे. त्या इमारतीमध्ये एनआरसीसाठी आवश्यक असलेली 10 बेड ठेवण्याची जागा असून तेथे भोजन, तसेच नाश्टा तयार करण्यासाठी देखील किचन सेंटर तयार आहे. तर कुपोषित बालकांच्या पालकांसाठी बाहेर मोठी जागा उपलब्ध असून एका वेळी तेथे किमान 50 लोक बाकड्यावर बसू शकतात आणि विश्रांती घेऊ शकतात. त्यामुळे सर्व सुविधा उपलब्ध असताना शासनाने मंजूर केलेले बालउपचार केंद्र का सुरू होत नाही, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
दिशा केंद्र या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते जगदीश दगडे यांनी एनआरसीसाठी दिशा केंद्राने दोन वर्षे सातत्याने राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासह मंत्रालयातील गाभा समितीकडे सतत पाठपुरावा केला आहे.प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ असावा, उपजिल्हा रुग्णालयात व ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी बालउपचार केंद्र आणि कर्जतमध्ये बालउपचार पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) कायम स्वरूपी असावी, अशी मागणी आहे.त्यासाठी पाठपुरावा करणारे आमच्या संस्थेचे अशोक जंगले हे आज या जगात नाहीत. त्यामुळे त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेले केंद्र सुरू व्हावे आणि जंगले यांच्या कार्याला त्यातून श्रद्धांजली वाहावी अशी आमच्या संस्थेची इच्छा आहे. त्यातून तालुक्यात सध्या असलेल्या 120 सॅम आणि मॅममधील कुपोषित बालकांवर उपचार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी कर्जतच्या एनआरसी केंद्रासाठी जागा निश्चित केली आहे, त्याशिवाय तेथे एनआरसीसाठी शासनाच्या निकषाप्रमाणे आवश्यक असलेला स्टाफदेखील मंजूर झाला आहे. त्यामुळे काही त्रुटी असल्यास त्या दूर करून तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माने यांनी दिले आहेत.
कर्जत उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी एनआरसीबाबत वरिष्ठांच्या आदेशाने जागेवर एनआरसी सुरू करण्यासाठी काम सुरू केले आहे. आवश्यक बेड आले असून त्या इमारतीला लहान मुलासाठी आणि कुपोषित बालकांसाठी आकर्षित वाटणारी रंगरंगोटी करण्यास सुरुवात केली आहे. दिवंगत अशोक जंगले यांच्या पाठपुराव्यामुळे आम्ही वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून कर्जत तालुक्यातील कुपोषण शून्यावर आणण्यासाठी एनआरसी मंजूर करून आणली आहे. आता ती कार्यन्वित होऊन कर्जत तालुक्यात सध्या असलेली कुपोषित बालके यांच्यावर लवकर उपचार व्हावेत यासाठी एनआरसी सुरू करून जंगले यांच्या कार्याला श्रद्धांजली वाहिली जाईल, अशी भावना यामागे आहे.
-संतोष पेरणे, खबरबात