माणगाव : प्रतिनिधी
कोरोना संकटानंतर कोकणावर निसर्ग चक्रीवादळाने महासंकट कोसळले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री, नेतेमंडळी यांनी पाहणी दौरे केले, मात्र रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त आज आठ दिवस उलटूनही राज्य शासनाच्या प्राथमिक मदतीपासून वंचित आहे. अशा वेळी विरोधी पक्ष असलेला भाजप जनतेसाठी धावून आला आहे. भाजपच्या वतीने वादळग्रस्तांना मदतीचा हात देण्यात येत आहे.
चक्रीवादळानंतर सर्वप्रथम भाजपकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सहकार्यांसमावेत रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांची पाहाणी केली आणि प्रदेश भाजपकडून पत्रे, सौरदिवे यांच्यासह जीवनावश्यक अन्नधान्याचे किट अशी मदत कोकणात पोहोचत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईहुन मदत रवाना केली. त्यांनीही दोन दिवसांचा पाहणी दौरा केला. भाजपकडून रवाना झालेली मदत आता गावोगावी पोहोचत आहे. माणगाव तालुक्यासाठी दोन ट्रक सिंमेट पत्रे (सुमारे दोन हजार नग), सुमारे दोन हजार सौरदिवे आणि सुमारे दोन हजार कुटुंबासाठी जीवनावश्यक अन्नधान्याचे किट पाठविण्यात आले. मदतीचे वाटप माणगाव तालुका भाजप अध्यक्ष संजय (आप्पा) ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका सरचिटणीस योगेश सुळे, शहराध्यक्ष राजू मुंढे, निजामपूर विभाग अध्यक्ष गोविंद कासार यांच्या हस्ते करण्यात आले. विशिष्ट सर्व्हेप्रमाणे नितांत गरजू लोकांपर्यंत मदत मिळत आहे. अद्यापर्यंत 800 सिमेंट पत्रे, 900 सौरदिवे आणि 50 जीवनावश्यक किटचे वाटप माणगाव तालुका व शहर भाजपच्यामार्फत करण्यात आले आहे.