Breaking News

महाविकास आघाडीत बेबनाव

शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी काही दिवसांपूर्वी पुणे येथे झालेल्या सभेत बोलताना महाविकास आघाडीमध्ये वर सत्तेत आपण एकत्र असलो, तरी खाली कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नाही, अशी जाहीर कबुली दिली होती. कार्यकर्ते सोडा पण आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्येदेखील जमत नसल्याचे वारंवार दिसून येत आहे.

महाराष्ट्रात आघाडी सरकार सत्तेवर येऊन दीड वर्ष होऊन गेले, मात्र अद्यापही या आघाडी सरकारमधील तीन पक्षांमध्ये अधूनमधून धूसफूस सुरूच असते. या वादावादीचा नवा अंक सध्या रायगड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. रायगडात शिवसेना आणि राष्ट्रवादी हा वाद तसा जुनाच आहे. राज्यात नवी समीकरणे उदयास आल्यानंतर हा वाद शमला असेल असे वाटत होते, पण वाद शमण्याऐवजी आणखी उफाळून येत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. त्याला वाट मोकळी करून दिली ती शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी. श्रीवर्धनमध्ये झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करीत महाविकास आघाडी ही सरकार स्थापन करण्यासाठी करण्यात आलेली तडजोड असल्याचे म्हटले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकत नाही, तर शिवसेना ही काँग्रेसी विचारांची कशी होऊ शकते, असा सवाल करीत आगामी सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचेही गीतेंनी जाहीर केले. गीतेंचा सर्व रोख हा सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे होता. तसे पाहिले तर गीते विरुद्ध तटकरे हा सामना जुनाच आहे. गत लोकसभा निवडणुकीत तटकरेंनी शेकापच्या मदतीने गीतेंचा पराभव करून त्यांचा सहा वेळचा विजयी अश्वमेध रोखला. त्याआधी झालेल्या निवडणुकीत गीतेंनी तटकरेंना धोबीपछाड दिली होती. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील समीकरणे बदलली आणि शिवसेना, राष्ट्रवादीसह काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र आले. राज्यात सत्तेसाठी हे पक्ष एकत्र आले असले, तरी खालच्या स्तरावर मात्र बेकीच दिसून येते. त्यातच रायगडात शिवसेनेचे तीन आमदार असूनही पालकमंत्रिपदाची माळ मात्र राष्ट्रवादीच्या एकमेव विधानसभा आमदार असलेल्या सुनील तटकरेंच्या कन्या आदिती यांच्या गळ्यात पडल्याने शिवसेनेचा तीळपापड झाला. त्याहीपुढे जाऊन तटकरे कुटुंबीय विकासकामांमध्ये दुजाभाव करीत असल्याचा शिवसेनावाल्यांचा आरोप आहे. त्यामुळेच विश्वासघातकी राष्ट्रवासोबत आघाडी नकोच, असा पवित्रा शिवसेना आमदार आणि पदाधिकार्‍यांनी घेतला आहे. हा झाला शिवसेना आणि राष्ट्रवादीमधला वाद. त्याचबरोबर आता काँग्रेसनेसुद्धा राष्ट्रवादीला लक्ष्य केले आहे. काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अलिबाग येथील दौर्‍यात काँग्रेसला कुणीही गृहित धरू नये, असा सूचक इशारा सुनील तटकरेंचे नाव न घेता दिला. घरत हे एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे आजी-माजी आमदार आणि पदाधिकार्‍यांना त्यांच्या पनवेल तालुक्यातील शेलघर येथील सुखकर्ता निवासस्थानी स्नेहभोजनाला बोलावून काँग्रेस-शिवसेना युतीचे संकेत दिले आहेत. तिसरीकडे शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देतानाच ‘रायगडच्या शिखंडीने आमचा पराभव केला, असे म्हणत अप्रत्यक्षपणे तटकरेंवरच शरसंधान साधले. एकूणच तटकरे हे डोईजड होत असल्याने सहकारी पक्षच त्यांच्या विरोधात बोलू लागले आहेत. यामुळे तटकरेंनी एक पाऊल मागे जात कळंबोलीतील पक्षाच्या बैठकीत महाआघाडीचा सूर आळवला, पण सहकारी पक्ष त्यांना कितपत दाद देतात, हे लवकरच कळेल.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply