अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यासाठी आणखी 11 हजार कोविशिल्ड लशींचा साठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात लशी उपलब्ध झाल्या असल्या तरी आरोग्य कर्मचार्यांकडून मात्र लसीकरणाला अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील 50 टक्के आरोग्य कर्मचारी अद्यापही लसीकरणापासून दूर आहेत.
16 जानेवारीपासून जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाठी नऊ हजार 700 लशी उपलब्ध झाल्या होत्या. दुसर्या टप्प्यात आणखी 11 हजार कोविशिल्ड लसी उपलब्ध झाल्या आहेत. म्हणजेच जवळपास 20 हजार लशी जिल्ह्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत. पुरेशा लसी उपलब्ध होऊनही आरोग्य कर्मचार्यांकडून मात्र लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.
आरोग्य कर्मचार्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे सध्या दिसून येत आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील आठ हजार आरोग्य कर्मचार्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. 25 जानेवारी अखेर जिल्ह्यातील दोन हजार 708 आरोग्य कर्मचार्यांचे लसीकरण होणे अपेक्षित होते. यापैकी एक हजार 369 जणांनी प्रत्यक्ष लस घेतली. हे प्रमाण अपेक्षित लसीकरणाच्या 51 टक्के एवढेच आहे. खासगी डॉक्टरही लसीकरणापासून दूरच आहेत.
जिल्ह्यात सध्या अलिबाग, पेण, पनवेल, माणगाव आणि कर्जत येथील सात केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. पेण येथील लसीकरण लवकरच पूर्ण होणार आहे. यानंतर उरण येथे लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. महाड आणि श्रीवर्धन येथेही लसीकरण सुरू करण्याची तयारी आरोग्य विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान ज्या एक हजार 369 डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचार्यांनी कोरोनाची लस घेतली, त्यांना आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा तीव्र त्रास जाणवलेला नाही. अंगदुखी आणि सौम्य ताप अशी सर्वसाधारण लक्षणे काही जणांमध्ये दिसून आली आहेत. त्यामुळे लशीला घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉ. गजानन गुंजकर यांनी स्पष्ट केले. खासगी डॉक्टरांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …