गुवाहाटी : वृत्तसंस्था
भारताविरुद्धची ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका इंग्लंडने 3-0 अशी जिंकत यजमानांना व्हाईटवॉश दिला. तिसर्या सामन्यात भारताचा अवघा एका धावेने पराभव झाला. इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताला 120 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला अखेरच्या षटकात 3 धावांची गरज होती, पण भारतीय महिला संघाला फक्त एकच धाव काढता आली. या षटकात भारताने मोक्याच्या क्षणी दोन विकेट गमावल्याने पराभवाचा धक्का बसला.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर डॅनियल वॅट, बिउमाँट आणि एमी जोन्स यांनी केलेल्या खेळीने इंग्लंडला 119 धावा करून दिल्या. सलामीच्या जोडीने केलेल्या 51 धावांच्या भागिदारीनंतर इंग्लंडच्या संघाला 119 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून अनुजा पाटील, हर्लीन देओल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या; तर एकता बिश्त आणि पूनम यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.
120 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला 20 षटकांत 118 धावा करता आल्या.