Breaking News

रायगड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये 24 भात खरेदी केंद्र सुरू होणार

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात भातकापणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.  आठवडाभरात जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने 24 भात खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रांवर सर्वसाधारण प्रतीचा भात एक हजार 940 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री करता येणार आहे तसेच या वर्षीही राज्य शासनाकडून अतिरिक्त दिल्या जाणार्‍या बोनसची रक्कम शेतकर्‍यांना दिली जाणार आहे.

जिल्ह्यात भात खरेदी केंद्र सुरू करा, अशी मागणी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. त्यानुसार पुढील आठवड्यापासून भात खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनकडून देण्यात आली. शेतकर्‍यांना भाताची विक्री शासकीय खरेदी केंद्रावर करायची असून त्यासाठी केंद्रावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.  

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासनाने या वर्षासाठी सर्वसाधारण दर्जाच्या भाताला प्रती क्विंटल एक हजार 940 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. गतवर्षी भातासाठी एक हजार 868 रुपये हमीभाव व 700 रुपये बोनस असा एकूण दोन हजार 568 रुपये दर शेतकर्‍यांना देण्यात आला. यात ’अ’ दर्जाच्या भाताच्या किमतीत साधारण 20 रुपयांचा फरक असणार आहे.

रायगड जिल्ह्यात दोन लाख 30 हजार मेट्रिक टन इतकी विक्रमी भाताची खरेदी 2008मध्ये झाली होती. हा विक्रम मागल वर्षी मोडीत निघाला असून एका वर्षात तब्बल 4.10 मेट्रिक टन भात खरेदी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून झाली आहे.

भातखरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 24 भात खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहेत.  शेतकर्‍यांना वाहतूक करणे सोयीचे होईल अशाच मध्यवर्ती ठिकाणी ही सर्व केंद्र आहेत.

-के. टी. ताटे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply