Breaking News

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, लोकनेते ‘दिबां’च्या नावासाठी प्रकल्पबाधित समितीचा पाठिंबा

पनवेल : वार्ताहर

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्यास सिडको व शासनाविरोधात प्रकल्पबाधित 18 गाव समिती प्रचंड जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा सोमवारी (दि. 7) झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित पदाधिकार्‍यांनी दिला. या पत्रकार परिषदेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित 18 गाव समितीचे नंदाजी मुंगाजी, अ‍ॅड. प्रशांत भोईर, महेंद्र पाटील, गजानन पाटील, गोवर्धन डाऊर, सुनील म्हात्रे, किरण केणी, दत्तात्रय पाटील, जयवंत उर्फ आमदार परदेशी, अ‍ॅड. रेश्मा मुंगाजी, वनिता पाटील, रूपेश धुमाळ आदी उपस्थित होते. या वेळी नंदाजी मुंगाजी यांनी सांगितले की, सिडकोने 1970 साली ठाणे व रायगड जिल्ह्यातील 95 गावांच्या जमिनी नवी मुंबई प्रकल्पासाठी सक्तीने संपादित केल्यामुळे शेतकरी व प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड जनआंदोलन उभारले गेले. त्यातूनच 12.5 टक्के विकसित भूवाटप योजना उदयास आली. लोकनेते दि. बा. पाटील यांचे प्रचंड उपकार आम्हा भूमिपुत्रांवर आहेत. त्यामुळे सनदशीर मार्गाने रस्त्यावर उतरून अथवा न्यायालयीन मार्गाने शासनाशी लढा देऊन येणार्‍या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास भाग पाडू. अ‍ॅड. प्रशांत भोईर यांनी सांगितले की, पनवेल तालुक्यातील वडघर, करंजाडे, पारगाव, दापोली, ओवळे, कुंडेवहाळ, नानोशी, वाघिवली, उलवे, तरघर आदी ग्रामपंचायतींतील हद्दीत असणार्‍या गावांच्या जमिनी या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास देण्यात आल्या आहेत. आमच्या जमिनी शासनाने घेतल्या असल्याने आम्हाला नावाबाबत आग्रह धरण्याचा अधिकार आहे. त्यामुळे लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दिले पाहिजे. यासाठी येत्या 10 जूनला मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार असून, यात 18 गावांचा जाहीर सक्रिय पाठिंबा असणार आहे. लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी सन 2014पासून आम्ही करीत आहोत, ज्याची दखल शासनाने घेतली पाहिजे. आमचे आंदोलन हे राजकारणविरहीत असून जे आमच्यासोबत येतील त्यांचे आम्ही स्वागत करू व जे आमच्याविरोधात उतरतील त्यांना ग्रामस्थ नक्कीच धडा शिकवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करीत शासनाने लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, असा आग्रह धरला.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply