आमदार, महापौर आणि सभागृह नेत्यांचा ‘त्या’ नियुक्तीशी काहीही संबंध नाही!
पनवेल : रामप्रहर वृत्त
‘निर्भीड लेख’ने दिलेली बातमी संपूर्णत: चुकीची, दिशाभूल करणारी आणि लोकप्रतिनिधींवर अकारण आरोप करणारी आहे. मला महापालिकेतील तीन महिन्यांच्या सेवेसाठी आणि उपजिल्हा रुग्णालयातील आतापर्यंत झालेल्या सहा महिन्यांच्या सेवेसाठी माझ्या कंत्राटदाराकडून पगार मिळाला आहे, अशी स्पष्टोक्ती उपजिल्हा रुग्णालयातील सफाई कर्मचारी जयेश तानाजी देशमुख यांनी आज केली आहे.
कोणत्याही बातमीची शहानिशा न करता केवळ विरोधाला विरोध म्हणून काम करायचे आणि ‘गिरा तो भी टांग उपर’ या पद्धतीने वागायचे हीच ‘निर्भीड लेख’ या वृत्तपत्राची खासियत आहे हे कालच्या त्यांच्या बातमीतून स्पष्ट होते. याच बातमीत ‘निर्भीड’ म्हणविणार्या वृत्तपत्राने सदाफ शरीफ शेख या कथित कर्मचार्याचाही उल्लेख केला आहे, मात्र या नावाच्या कोणत्याही कर्मचार्याला आपण नेमले नसल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नागनाथ येमपल्ले यांनी स्पष्ट केले. पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील बातमीमुळे आपल्या हाती घबाडच आले या अविर्भावात प्रसिद्ध केलेली बातमी पूर्णपणे निराधार आणि खोटी असल्याचे संबंधित अधिकारी आणि व्यक्तींशी बोलल्यानंतरही स्पष्ट होते.
पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेसाठी महानगरपालिकेने जयेश देशमुख या कर्मचार्याची कंत्राटदारामार्फत हंगामी नियुक्ती केली होती. ही नियुक्ती जानेवारी ते मार्च 2020 या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी होती. या तीनही महिन्यांत जयेश देशमुख यांना नेमून दिल्याप्रमाणे त्यांचे कंत्राटदार साईगणेश इंटरप्रायजेस यांच्यामार्फत पगारही देण्यात आला होता. नेमणुकीनुसार तीन महिन्यांनंतर त्यांची सेवा खंडित झाली.
पनवेल उपजिल्हा रुग्णालयात साफसफाई कर्मचार्यांची कमतरता असल्याने या रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नागनाथ येमपल्ले यांनी ओमसाई सुशिक्षित बेरोजगार संघटनेमार्फत त्याच जयेश देशमुख यांना मे महिन्यापासून सफाई कर्मचार्याच्या पदावर रुजू करून घेतले. तसेच त्यांचा मे ते ऑक्टोबर 2020 पर्यंतचा पगारही वेळोवेळी दिला आहे.
ही सर्व वस्तुस्थिती असताना मात्र ‘निर्भीड लेख’ने वर्षभर पगारच मिळाला नाही असे स्वरूप देऊन नसलेली बातमी रंगविण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय सदाफ शरीफ शेख या कर्मचार्याची महापालिकेने वा उपजिल्हा रुग्णालयाने कोणत्याही पदावर नियुक्तीच केली नसल्यामुळे त्यांना पगार देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्वत: शेख यांनीच सांगितले.
मात्र वस्तुस्थिती काय आहे. कोविडसारखी गंभीर परिस्थिती आहे. रुग्णालयात कर्मचार्यांचा तुटवडा आहे. या सर्व बाबींची दखल न घेता वस्तुस्थितीशी विपरीत अशी खोटी बातमी रंगविण्याचा प्रयत्न ‘निर्भीड लेख’ने केल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारीही आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
जयेश देशमुख यांची नियुक्ती पनवेल महानगरपालिकेने आणि उपजिल्हा रुग्णालयाने तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटदारामार्फत केली आहे. या नियुक्तीशी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कल्पना चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांचा संबंध नाही. तसेच जयेश देशमुख वगळता इतर कोणत्याही कर्मचार्याची कोणत्याही कंत्राटदारामार्फत उपजिल्हा रुग्णालयाच्या साफसफाई विभागात नियुक्ती केलेली नाही.
-डॉ. नागनाथ येमपल्ले, अधीक्षक, पनवेल उपजिल्हा रुग्णालय
महापालिकेतर्फे तसेच जानेवारी ते मार्च 2020 हा तीन महिन्यांचा पगार मला मिळाला असून, त्यानंतर मे ते ऑक्टोबर या सहा महिन्यांचा पगारही माझे कंत्राटदार ओमसाई सुशिक्षित बेरोजगार संघटना यांच्यामार्फत मला मिळाला आहे. त्यामुळे माझी कुणाविषयी तक्रार असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
-जयेश तानाजी देशमुख, साफसफाई कर्मचारी, पनवेल उपजिल्हा रुग्णालय