मोहोपाडा : प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षापासूनचा पोलीस भरतीचा मार्ग सुखकर झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक विद्यार्थी गेले काही वर्ष पोलीस भरती लांब गेल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी शिथिलता केली असताना पोलीस भरतीचाही मार्ग सुकर झाला आहे, त्या अनुषंगाने पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोलीस भरती परीक्षा सुरू असून रसायनीतील पिल्लई एचओसी इंटरनॅशनल स्कूलमध्ये रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्तात पोलीस भरती लेखी परीक्षा सुरू आहे. परिक्षेच्या एक दिवस अगोदरपासूनच पिल्लई परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या वेळी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील दांडफाटा येथे बाहेरगावाहून आलेल्या परिक्षार्थीसाठी तीन आसनी रिक्षातून मोफत प्रवासाची सोय रसायनी पोलिसांनी केली होती. तर राज्यातील विविध भागातून एक दिवस अगोदर आलेल्या परिक्षार्थीसाठी मोहोपाडा जनता विद्यालयात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या जेवणापासून नाश्ता, चहा पाण्याची व्यवस्था रसायनी पोलिस ठाण्याकडून मोफत करण्यात आली होती.
परिक्षार्थींना मोहोपाडा येथे मैदानावर वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रसायनी पोलिसांकडून परिक्षार्थींना मार्गदर्शन होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तर पिल्लई स्कुलनजीक परिक्षार्थी साठी नाश्ता, चहा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रसायनी पोलीस ठाण्याकडून करण्यात आली आहे. याठिकाणी पारदर्शक कारभार सुरू असून ठिकठिकाणी सी.सी.टिव्ही कँमेरा, चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.