Breaking News

विंडीजची श्रीलंकेवर विजयी आघाडी

अँटिगा ः वृत्तसंस्था

एवीन लेव्हीसचे शतक (103) आणि शाय होपचे अर्धशतक (84) याच्या जोरावर वेस्ट इंडिजने श्रीलंकेवर दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात पाच गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयासह विंडीजने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने विजयासाठी 274 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान विंडीजने पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. लेव्हीस आणि होप यांनी 192 धावांची सलामी दिली. दोघांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. या भागिदारीदरम्यान लेव्हीसने शतक, तर होपने अर्धशतक केले. विंडीजला 192 धावांवर लेव्हिसच्या रूपात पहिला धक्का बसला. त्याने 121 चेंडूंत आठ चौकार आणि चार षटकारांसह 103 धावांची खेळी केली. लेव्हीसनंतर होपही बाद झाला. त्याने 108 चेंडूंत सहा चौकारासह 84 धावा चोपल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर विंडीजने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. डॅरेन ब्राव्हो, कर्णधार केरॉन पोलार्ड आणि फॅबियन एलन हे स्वस्तात बाद झाले, पण त्यानंतर निकोलस पूरन आणि जेसन होल्डर या जोडीने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी विंडीजने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते. लंकेने 50 षटकांत आठ बाद 273 धावा केल्या. लंकेकडून दनुष्का गुनथालिकाने सर्वाधिक 96 धावांची खेळी केली, तर तर दिनेश चांदिमालने 71 धावा चोपल्या. विंडीजकडून जेसन मोहम्मदने तीन गडी बाद केले, तर अल्झारी जोसेफने दोन गडी टिपले. उभय संघातील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी (दि. 14) खेळविण्यात येणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply