Breaking News

पुरावेळी राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय?

सदाभाऊ खोत यांचा संतप्त सवाल

वर्धा : प्रतिनिधी

 ’पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय? पुराच्या वेळी आले असते, पाण्यात उतरले असते तर स्वागत केले असते,’ अशी बोचरी टीका राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली आहे. राष्ट्रवादीला पूरग्रस्तांशी देणं-घेणं नसून ते केवळ कोरडी सहानुभूती दाखवत आहेत, असा आरोपही सदाभाऊ खोत यांनी केला आहे. स्वातंत्र्य दिन सोहळ्याला मंत्री सदाभाऊ खोत गुरुवारी वर्ध्यात आले होते. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापूर, सातारा, सांगलीत महापुराने मोठे नुकसान झाले आहे. सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठीशी उभे आहे. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यांना पुराशी देणंघेणं नसून कोरडी सहानुभूती दाखवत आहेत, असा आरोप सदाभाऊंनी केला आहे. महापुराच्या विषयावरून राष्ट्रवादीला राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. रिकामटेकडे लोेक निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून लोकांची मनं भडकावून सरकारविरोधात वातावरण तयार करायचे काम करत आहेत, असेही खोत म्हणाले. येत्या विधानसभेत आमदारकीच्या जागा कशा वाढतील, यादृष्टीने राष्ट्रवादी काम करीत आहे. हा मदत करण्याचा काळ आहे, पण राष्ट्रवादी राजकारणाचा फार्स करीत आहे, अशीही टीका सदाभाऊ खोत यांनी केली. सांगली, कोल्हापुरातील पुरानंतर आता भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना कराव्या लागणार आहेत. पुन्हा अशी परिस्थिती उद्भवल्यास लोकांना बाहेर जाण्याचे पर्यायी मार्ग तयार करावे लागणार आहेत. पुलांची उंची वाढवावी लागणार आहे. या सरकारने मदतीच्या अर्थसहाय्यात मोठी वाढ केली आहे, असेही खोत यांनी सांगितले. या वेळी सदाभाऊंनी यापूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारवरही टीका केली. 2005मध्ये यांचे सरकार असताना पूर आला तेव्हा पर्यायी व्यवस्थेवर काम का केले नाही. त्या वेळी किती मदत द्यायचे? याचे आकडे जाहीर करावे. मावळ घटनेवेळी, ऊस उत्पादक आंदोलनप्रसंगी यांचे शेतकरी प्रेम कुठे गेले होते, असा प्रश्नही खोत यांनी उपस्थित केला.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply