Breaking News

‘बाहास माला सालंमा धाड’ पथनाट्याद्वारे वाडी-वस्त्यांवर प्रबोधन व जनजागृती

आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प

पाली : प्रतिनिधी

जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर रोखण्यासाठी व त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी ’बाहास माला सालंमा धाड’ (बाबा मला शाळेत पाठवा) या पथनाट्य प्रयोगाचे सादरीकरण करण्यात येत आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या पेण येथील अधिकारी शशिकला अहिरराव यांच्या सहकार्याने आणि सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावार यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यात हा पथदर्शी उपक्रम राबविला जात आहे. आदिवासी समाजाची मुले आणि काही प्राथमिक शिक्षक ’बाहास माला सालंमा धाड’ हे पथनाट्य सादर करीत आहेत.

 एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या पेण येथील कार्यालयाने हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यासाठी पुढाकार घेतला असून नियोजित 13 प्रयोगांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. आतापर्यंत माणगाव, रोहा, सुधागड, पेण, खालापूर तालुक्यात हे पथनाट्य सादर केले आहे. व 30 ऑक्टोंबरपर्यंत प्रयोग करण्यात येणार आहेत.

या पथनाट्याचे लेखन दर्यागाव (ता. सुधागड) शाळेचे शिक्षक राजू बांगारे यांनी केले आहे. तर दिग्दर्शन पाच्छापुर शाळेचे शिक्षक अनिल राणे यांनी केले आहे. बाहास माला सालंमा धाड  या पथनाट्य गटाचे अध्यक्ष दत्ता वाघमारे व सचिव रोहिदास हिलम हे आहेत. नारायण हंबीर, दामू शिद, विशाल वाघमारे, महादू वारगुडे, ज्ञानेश्वर वारगुडे, कमलाकर शिंदे, मोरेश्वर कांबळे, सतिश खानेकर, जनार्दन भिलारे, दिपक दंत, बजरंग बेलोसे, कमलाकर तांडेल, राम संकाये, भगवान दंत व साई बांगारे हे कलाकार हे  पथनाट्य सादर करतात.

या पथनाट्यात आदिवासी बांधवांच्या विविध समस्या त्यांच्याच भाषेत प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत. त्यादूर करण्यासाठी शिक्षणाची किती गरज आहे हे आदिवासी बांधवांना पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो.

आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी प्रबोधन व जनजागृती करण्याचा हा पथदर्शी प्रकल्प स्वयंस्फूर्तीने राबविला. पथनाट्यातील सर्व कलाकार यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. आदिवासी विभागाचे चांगले सहकार्य मिळत आहे. शिवाय स्थलांतर रोखण्यासाठी संबंधित ठेकेदारांकडून हमीपत्र भरून घेतले जात आहेत.

-दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली-सुधागड

आदिवासींचे प्रबोधन करण्यासाठी त्यांच्याच भाषेत या पथनाट्याचे सादरीकरण होत आहेत. त्यात  आदिवासी विभागाच्या विविध योजनांची माहितीदेखील दिली जाते.

-शशिकला अहिरराव, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग, पेण

रायगड जिल्ह्यातील आदिवासी जमाती (कातकरी) यांचे स्थलांतर होण्याचे प्रमाण जास्त आहे. परिणामी त्यांची मुले ही शिक्षणापासून वंचित राहतात. याबाबत जनजागृती करण्याची तहसीलदार रायण्णावार यांनी आम्हाला ही एक संधी दिली आहे. त्यामुळे आम्ही पथनाट्याच्या माध्यमातून या समाजामध्ये परिवर्तन व प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. बहुतांश आदिवासी वाडीवर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

-मोरेश्वर कांबळे, अध्यक्ष, सुधागड तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समिती

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply