Breaking News

जिताडा पालनास व्यवसायिकतेची जोड हवी

कुलाबा किल्ला, पांढरा कांदा व जिताडा मासा ही अलिबागची ओळख आहे. अलिबाग आणि पेण तालुक्यातील खारेपाट भागात आढळणारा  सोनेरी रंगाचा जिताडा मासा इतर माशांपेक्षा चवीला रुचकर असतो. अलिबागला आल्यावर पर्यटक या माश्यावर हमखास ताव मारतात. त्यामुळे त्याला मागणीदेखील भरपूर आहे. अलिबाग व पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील  शेतकरी आपल्या घरासमोर छोट्या तळ्यात जिताडा पालन करतात. घरात पुरेल आणि उरेल येवढेच मत्स्य उत्पादन या शेततळ्यामधून घेतले जाते. वास्तविक  जिताडा पालन व्यवसायातून रोजगार निर्मिती होऊ शकते. त्यामुळे जिताडा समुह विकास प्रकल्प (क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम) राबविणे, जिताडयाचे मत्स्यबीज केंद्र उभारणे, जिताडा पालनास व्यवसायिकतेची जोड देणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

रायगड जिल्ह्यातील जिताडा इतका प्रसिद्द आहे की, केवळ जिताड्याच्या कालवनाने अनेक कामे झाली आहेत. मोठा पाहुणा आला आणि त्याच्याकडून एखादे काम करुन घ्यायचे असल्यास त्यास जिताडा देऊन खुश केले जाते. अलिबागमधून मुंबईला जाताना आजही अनेक जण पुढार्‍यांसाठी जिताड्याचे डबे सोबत घेऊन जातात.

अलिबाग व पेण तालुक्यातील खाडीपट्ट्यात आढळणारा जिताडा हा मासा रुचकर चवीसाठी प्रसिध्द आहे. त्यामुळे खारेपाट विभागातील शेतकरी शेततळ्यामध्ये जिताड्याचे उत्पादन घेत असतात. पावसाळ्याच्या सुरवातीला जिताड्याची पिल्ले आणून शेततळ्यात सोडली जातात. पावसाळ्यांनतर तयार झालेले मासे जवळपासच्या बाजारात विकले जातात. या माशाला स्थानिक बाजारात मोठी मागणी असते. किलो मागे पाचशे ते सातशे रुपयांचा दर जिताडा उत्पादक शेतकर्‍यांना मिळत असतो. मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील पर्यटक अलिबागला आल्यावर या जिताड्यावर हमखास ताव मारत असतात. खारेपाटातील शेतकरी आपल्या घरासमोर तसेच शेतघरालगतच्या तलावांमध्ये जिताड्याचे उत्पादन घेतात. हे तलाव आकाराने अतिशय लहान असतात. जुजबी ज्ञान आणि पारंपरीक पध्दतीने या जिताड्याचे उत्पादन शेतकरी घेत असतात. त्यामुळे या उत्पादनाला व्यवसायिकतेची जोड देणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

सोनेरी रंगाचा जिताडा हा मासा खार्‍या, निमखार्‍या तसेच गोड्या पाण्यात वाढतो म्हणून जलसंवर्धनासाठी हा अत्यंत योग्य असा मासा समजला जातो. हा मासा तलावामध्ये मोकळ्या पाण्यात, पिंजर्‍यामध्ये (ओपन वॉटर केजेस), तलावात पिंजर्‍यामध्ये आणि कोंडवाड्यात (पेन कल्चरमध्ये) सुध्दा वाढवला जातो. या जिताड्याचे खाद्य रुपांतर प्रमाण चांगले आहे. त्यांना कमी प्रतीचे मासे (टाकाऊ मासे) त्याच बरोबर कृत्रिमरित्या तयार केलेले सुके (शेवया) खाद्यसुध्दा पुरवले जाते. या माशाचे उबवणी केंद्रात (हॅचरीत) बिजोत्पादन केले जाते. परंतु ही माहिती शेतकर्‍यांना नाही.

सध्या जिताड्यांना केवळ रायगड जिल्ह्यातच मागणी आहे. त्यामुळे इथले शेतकरी गरजेपुरतेच जिताड्याचे उत्पादन घेतात. परिणामी जास्त मेहनत घेवूनही त्यांच्या आर्थिक उत्पन्नाला मर्यादा पडतात. छोट्या तलावांमधून मर्यादित उत्पादन मिळते. हे उत्पादन वाढवायचे असेल तर समुह विकास प्रकल्प राबवावा लागेल. त्यासाठी शासकीय मदत गरजेची आहे. पेण आणि अलिबाग तालुक्यात सुमारे एक हजार शेततळी आहेत. मात्र त्यांची शेततळ्यांच्या सेंट्रल अ‍ॅक्वाकल्चर अ‍ॅथॉरिटीकडे नोंद झालेली नाही. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ आजवर या मत्स्य उत्पादकांना मिळालेला नाही. आता मरीन प्रॉडक्ट एक्सपोर्ट अथॉरिटी तसेच सेंट्रल अक्वाकल्चर अथॉरीटीकडे या शेततळ्यांची नोंद करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मरीन प्रॉडक्ट एक्सपोर्ट अथॉरीटीकडे सुमारे 300 शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. उर्वरीत शेतकर्‍यांच्या नोंदणीसाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याला शेतकर्‍यांनीदेखील साथ द्यायला हवी.

समुह विकास प्रकल्प यशस्वी झाल्यास यातून रोजगार निर्मिती होईल. इथल्या शेतकर्‍यांना तसेच तरुणांना  त्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. शासनाकडून विविध शासकीय योजनांचाही लाभ त्यांना मिळू शकेल. मार्केटींग, इन्सुलेटेड व्हॅन (शीत वाहने), बर्फ  कारखाना, मत्स्यबीज केंद्र, माशांना लागणार्‍या खाद्याची निर्मिती असे पूरक व्यवसाय यातून सुरू होवू शकतील. यातून मोठी आर्थिक उलाढाल होवून स्थानिकांचे जीवनमान उंचाण्यास नक्कीच मदत होईल.

रायगड जिल्ह्यात जिताडा मत्स्यबीज केंद्र कुठेही नाही त्यामुळे हे बीज मिळविण्यापासूनच अडचणींना सुरूवात होते. सिंधुदुर्गातील केंद्रातून जिताड्याची पिल्ले आणावी लागतात किंवा खाडीतील पिल्ले आणून त्यांचे संवर्धन करावे लागते. ही बाब लक्षात घेवून रायगडात जिताड्याचे मत्स्यबीज केंद्र उभारणे गरजेचे आहे

जिताड्याचे व्यवसायिक उत्पादन घेतले तर शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. यातून कृषी पर्यटनाला चालना मिळू शकते. त्यासाठीच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. आलिबाग तालुक्यातील शहापूर गावात पूर्वापार जिताडा पालन केले जाते. जिताड्याचे गाव म्हणून हे गाव ओळखले जाते.  गावात 103 तळी आहेत. या सर्व तलावांना जोडणारा  पाणंद रस्ता गावात तयार करावा, अशी मागणी शहापूर ग्रामस्थांनी केली आहे.

खारेपाटात भातशेतीला पर्याय म्हणून जिताडा मत्स्त्य शेती सुरु केली आहे. अतिशय संघर्षमय परिस्थितीत हा व्यवसाय तरूण उद्योजक करीत असून ते एक हेक्टरला किमान तीन लाखाचे उत्पन्न घेत आहेत. या सर्व तलावापर्यंत पोचण्यासाठी उन्हाळी बांधावरून व पावसाळी चिखल तुडवून जावे लागते. त्यामुळे पर्यटकांची इच्छा असूनदेखील ताजा जिताडा खाण्यासाठी तलावापर्यंत जाता येत नाही. तसेच रस्ता नसल्याने ताजे मासे बाजारापर्यंत पोचवता येत नाहीत.  जिताडा व्हिलेजमध्ये जिताडा विक्री व  गृह पर्यटन असा दुहेरी उद्देश आहे. या सर्व संकल्पना वास्तवात आणण्यासाठी 103 तलावांना जोडणारा पालक मंत्री पाणंद रस्ता गावात तयार करावा अशी शहापूर ग्रामस्थांची शासनाकडे मागणी आहे. त्याचा विचार शासनाने करायला हवा.

-प्रकाश सोनवडेकर, खबरबात

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply