Breaking News

पारंपरिक पणत्यांबरोबर चायना मेड पणत्याही बाजारात दाखल

पेण : प्रतिनिधी

दिपावली म्हणजे दिव्यांचा सण, म्हणजे अंधःकारातून उजेडाकडे नेणारा तेजोमय सण. या सणात अंधःकारालाही प्रकाशमय करणार्‍या पारंपरिक मातीच्या पणत्या पेण बाजारपेठेत दाखल झाल्या असून, यामध्ये चायनीज पणत्यांचेही आक्रमण झालेले दिसत आहे.

दीपावली उंबरठ्यावर आली असून पेणच्या कुंभारवाड्यात बनविण्यात येणार्‍या पारंपरिक मातीच्या पणत्यांबरोबर चायनीज पणत्यांही  बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. दिवाळीला काही दिवस बाकी असले तरी ग्राहक आत्तापासूनच बाजारात पणत्या खरेदी करताना दिसत आहेत. दिवाळीमध्ये रंगोळीवर, तुळशी वृंदावनात, देवळांमध्ये, दरवाजांच्या कोपर्‍यात, दाराच्या उंबरठ्यावर लावण्यासाठी या पणत्या वापरल्या जातात.  पेण बाजारपेठेत दाखल झालेल्या या पणत्या 30 रुपये डझनपासून ते 100 रुपये डझनपर्यंत विकल्या जात आहेत.

गुजरातमधूनही विविध प्रकारच्या पणत्या पेणच्या बाजारात आणल्या आहेत. त्याचबरोबर हलक्या प्रतीच्या, उच्च प्रतीच्या, डिझाइन केलेल्या चिनी मातीच्या पणत्या सध्या येथील बाजारात विकल्या जात आहेत. मातीचे कंदील आणि झुंबरदेखील 150 ते 200 रुपयांना विकले जात आहेत.

दरवर्षी आम्ही गुजरातहून विविध प्रकारच्या पणत्या आणून पेणच्या बाजारात विकत असतो. मागील वर्षी कोरोना काळात थोडा फटका बसला, त्याची भर यावर्षी काढण्याचा निश्चय केला आहे. सध्या गुजरातमधून आणलेल्या पणत्यांची बाजारात चांगल्या प्रकारे विक्री होत आहे. दररोज दोन ते तीन हजार रुपयांची विक्री होत असल्याचे विक्रेता साहेब कुमार याने सांगितले.

आम्ही आवडीने बाजारातून पणत्या आणतो. सायंकाळी पणत्या लावल्याने वातावरण प्रसन्न होत असते. गेल्या दोन वर्षात कोरोनाचा प्रादूर्भाव असल्यामुळे अल्प प्रमाणात दिवाळी साजरी केली. परंतु यंदा मात्र उत्साहाने दिवाळी सण साजरा करणार आहोत.

-प्रियांका वैभव म्हात्रे, गृहिणी, पेण

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply