Breaking News

‘मुंबई-गोवा महामार्ग दीड वर्षात पूर्ण करणार’

रत्नागिरी : प्रतिनिधी
ऐन दिवाळीत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणवासीयांना आनंदाची बातमी दिली आहे. गेली 15 वर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग दीड वर्षात पूर्ण करणार असल्याची घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात बोलताना केली. गडकरी यांच्या या घोषणेमुळे कोकणी चाकरमान्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
दक्षिण गोव्यातील वेर्णा येथे एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. मुंबई-गोवा हा महामार्ग गोवा व महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. रस्ता बांधण्यासाठी सुमारे 11 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यावर गोवा, कर्नाटक व महाराष्ट्राचा प्रवास सुखद होईल, असे गडकरी म्हणाले.
मुंबई-गोवा महामार्गावर 15 वर्षांपूर्वी सुरू झालेला रायगड जिल्ह्यातील पळस्पे ते इंदापूर हा कामाचा टप्पा आजही प्रलंबित आहे. मधल्या काळात दोन वेळा ठेकेदार कंपन्या बदलण्यात आल्या. तरीही कामाला वेग मिळालेला नाही. इंदापूर ते वाकण फाटा रस्त्याची प्रचंड दुरवस्था आहे. त्याचबरोबर वाकण फाटा ते वडखळ येथील कामदेखील मोठ्या प्रमाणात अपुरे आहे. वडखळ नाका ते पळस्पे येथील 90 टक्के काम झाले असले तरी 10 टक्के न झालेल्या कामामुळे वाहतुकीस अनेक अडथळे येत आहेत. या पहिल्या टप्प्यातील अपुर्‍या कामासाठी 250 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. प्रामुख्याने सुकेळी खिंडीमध्ये रुंदीकरणाचे काम अडकलेले आहे. हे काम पुढील वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश ठेकेदार कंपनीला दिले आहेत, असे गडकरी म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्यात येत असलेल्या खेड ते लांजा या जवळपास 130 किमीच्या मार्गातील लांजा ते सावंतवाडी हा टप्पा जवळपास पूर्ण होत आला आहे. 15 टक्के काम बाकी आहे. गडकरी यांच्या घोषणेप्रमाणे काम दीड वर्षांत पूर्ण झाल्यास कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply