सभापती सुशिला घरत यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या बसस्थानकावरुन घाटमाथ्यावर तसेच कोकणात जाण्यासाठी सोयीचे बसस्थानक आहे. या बसस्थानकावरुन रोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र या बसस्थानकाचे काम थांबलेले आहे. तसेच या ठिकाणच्या शौचालयाची दुरवस्था झाल्याने विशेषता महिला प्रवाशांना याचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे पनवेल बसस्थानकातील शौचालयाची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी प्रभाग समिती ‘ड’ सभापती सुशिला घरत यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या शौचालयाची अतिशय दयनिय अवस्था झाली असून स्लॅब गळत आहे आणि तो कधीही कोसळू शकतो. तसेच या शौचालयातून अत्यंत दुर्गंधी पसरत आहे. सध्याची कोविडची परिस्थिती पाहता या शौचालयामुळे आणखी रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच या शौचालयाचे आऊटलेट हे वसाहतीतील नाल्यामधून काढण्यात आले आहे. त्यामुळे येथे राहणार्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे आऊटलेट दुसरीकडे वळविण्यात यावे अशी मागणीही या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
या गंभीर समस्येचा विचार करुन तातडीने शौचालयाची दुरुस्ती करावी, अशी मागणी सुशिला घरत यांनी केली. तसेच त्यांनी पनवेल बसस्थानकाला भेट देवून पाहणी करुन प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.