सर्वेश निरगुडा याने पटकावला प्रथम क्रमांक
कर्जत : बातमीदार
भारतीय जनता पक्ष आणि युवा मोर्चा नेरळ शहर मंडलाच्या वतीने आयोजित केलेल्या किल्ले बनविण्याची स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धकांनी अंबामाता मंदिराच्या प्रांगणात उभारलेले 11 किल्ले पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
नेरळ भाजप आणि युवा मोर्चाच्या वतीने प्रज्ञेश खेडकर यांनी पुढाकार घेऊन गावातील अंबामाता मंदिराच्या प्रांगणात किल्ले बनविण्याची स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धकांना किल्ले बनविण्यासाठी भाजपकडून सर्व साहित्य पुरविण्यात आले होते. स्पर्धेचे परीक्षण अनंत कर्वे यांनी केले.
स्पर्धेत सर्वेश निरगुडा याने प्रथम क्रमांक पटकावला. कुमार डबरे याच्या किल्ल्याला दुसरा आणि ओंकार जामघरे याच्या किल्ल्याला तिसरा क्रमांक मिळाला. भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर आणि युवामोर्चा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. नेरळ ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र लोभी, संतोष शिंगाडे, भाजप महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस मृणाल खेडकर, भाजप नेरळ जिल्हा परिषद वार्ड अध्यक्ष संदीप म्हसकर, नेरळ शहर चिटणीस योगेश ठक्कर, कर्जत शहर युवा मोर्चा चिटणीस सर्वेश गोगटे आदी या वेळी उपस्थित होते. नेरळ भाजप युवा मोर्चाचे केवल दहिवलीकर, अक्षय पेमारे, कल्पेश पांचाळ यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.