युनोस्कोच्या हेरिटेजसाठी माथेरानची राणी देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. पर्यटनाला चालना देणारी माथेरानची राणी म्हणजेच मिनिट्रेनने हेरिटेजसाठी युनोस्कोच्या पहिल्या फेरीमध्ये यश संपादन केले असून, दुसर्या फेरीकडे योग्य वाटचाल सुरू आहे. यापूर्वीदेखील 2002 साली युनेस्कोकडून माथेरानच्या मिनिट्रेनला हेरिटेज दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. आताही युनोस्कोच्या हेरिटेज दर्जाचे स्थान मिळविण्यासाठी मिनिट्रेन प्रयत्नशील आहे. मिनिट्रेनला हेरिटेज दर्जा प्राप्त झाल्यास माथेरानच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला जाईल.
येथील उद्योगपती सर आदमजी पिरभॉय यांनी स्वतःचे 16 लाख रुपये खर्चून 1901 मध्ये ही रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुलगा अब्दुल हुसेन आदमजी पिरभॉय यांनी 1907 मध्ये या रेल्वेचे काम पूर्ण केले आणि ही मिनिट्रेन जोमाने सुरू झाली. स्वातंत्र्यानंतर ही मिनिट्रेन भारत सरकारच्या अखत्यारीत आली. त्या वेळी वाफेच्या इंजिनवर ही मिनिट्रेन धावत होती. 1983 मध्ये वाफेचे इंजिन बंद करून डिझेलवर धावणारे इंजिन वापरले जाऊ लागले. 114 वर्षे उलटूनही ही मिनिट्रेन आजही डौलात धावत आहे. 2002च्या दरम्यान ही मिनिट्रेन युनेस्कोच्या हेरिटेज दर्जासाठी नामनिर्देशित करण्यात आली होती.
जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या नेरळ-माथेरान मिनीट्रेनचा प्रवास आणखी आकर्षक करण्याचा प्रयत्न रेल्वेने सुरू केला आहे. लाखो पर्यटक प्रवास करत असलेल्या मिनीट्रेनचे प्रवासी डब्बे आकर्षक करण्यास सुरुवात झाली आहे. माथेरानच्या जंगलात आढळणारे पाणी, घाट यांची चित्रे रेखाटलेले प्रवासी डबे मिनीट्रेनसाठी खास बनवून आणले आहेत. जागतिक वारसा यादीत नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनचा समावेश व्हावा, यासाठी मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्ड यांच्याकडून नेरळ-माथेरान नॅरोगेज ट्रक, या मार्गावरील सर्व स्थानके, मिनीट्रेनच्या दिमतीला असलेली वाफेवर तसेच नव्याने बांधलेली इंजिने आणि माथेरान स्थानक हे हेरिटेज वास्तूत समाविष्ट होणार आहे. त्यामुळे मिनीट्रेन बरोबर माथेरानचा वारसा सांगणारी परंपरा यांनादेखील स्थान मिळवून देऊन जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याचे महत्त्वाचे काम रेल्वे आणि माथेरान नगर परिषद करू पाहत आहे.
माथेरानचा वारसा सांगणार्या सांस्कृतिक उपक्रमांची फोटो गॅलरी उभी करण्याचा मनोदय आहे. माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीव आणि दुर्मिळ प्रजातीं आढळत आहेत. त्यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनासाठी गॅलरी उभारण्याचा विचार आहे. माथेरानच्या जंगलात आढळणार्या वनस्पती, विशिष्ट कालखंडात माथेरानमध्ये आढळून येणारे प्राणिजातींची माहिती पर्यटकांना व्हावी या साठीदेखील प्रयत्न केले जात आहेत. येथील कचर्याची विल्हेवाट लावण्याची पद्धत जगभरात पोहचवण्यासाठी माथेरान गिरिस्थान नगर परिषद प्रयत्न करणार आहे. ऊर्जा आणि वनसंवर्धनाची पद्धती यांनादेखील स्थान देण्याचा प्रयत्न राहणार आहे.
शतक महोत्सव साजरा केलेली 21 किलोमीटर अंतर घाटमार्गाने पार करणारी नेरळ-माथेरान मिनीट्रेन जागतिक हेरिटेजच्या नामांकनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार जाणार असल्याने मिनीट्रेनचा प्रवास अधिक आकर्षक करण्यावर मध्य रेल्वे लक्ष देत आहे. त्यामुळे 2017 मध्ये रेल्वेकडून एनडीएम एक श्रेणीतील तीन नवीन इंजिने मिनीट्रेनच्या ताफ्यात आली आहेत. त्याच श्रेणीमधील आणखी दोन इंजिने मध्य रेल्वेच्या कुर्ला येथील कार्यशाळेत तयार होत आहेत. पर्यटकांना 200 हून अधिक नागमोडी वळणे बसल्या जागेवरून दोन्ही दिशेला थेट आकाशपर्यंत पाहण्यासाठी प्रवासी डब्बे पारदर्शक बनविले जात असून, उच्च श्रेणीच्या पर्यटकांना वातानुकूलित प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्याची तयारीदेखील मध्य रेल्वेकडून सुरू आहे.
मिनीट्रेनमधून द्वितीय श्रेणीमधून प्रवास करणार्या पर्यटकांचा प्रवास आकर्षक होण्यासाठी मिनीट्रेनच्या डब्यांना नवीन लूक दिला जात आहे. हिरव्या रंगात नवीन डबे रंगवले जात असून माथेरानच्या जंगलात असलेले पक्षी, प्राणी यांची चित्रे त्या डब्यांवर साकारली जात आहेत. नेरळ-माथेरान घाट रस्त्यातील वेडीवाकडी वळणेही त्या डब्यांवर दिसू लागली आहेत. हे आकर्षक आणि पूर्णपणे नवीन 12 डबे मध्य रेल्वेच्या कुर्डुवाडी येथील कार्यशाळेत बनवले आहेत. नेरळ रेल्वे स्थानकाचा कायापालट होण्यास सुरुवात झाली आहे. नेरळ रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाची कामे प्रस्तावित आहेत. दरम्यान, नेरळ रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यासाठी आराखडा मंजूर झाला असून स्काय वॉक, दोन नवीन पादचारी पूल, सरकता जिना, प्रवाशांसाठी निवारा शेड अशी बरीच कामे नेरळ रेल्वे स्थानकात नियोजित आहेत. नेरळ स्थानकात मुंबई दिशेकडे नवीन पादचारी पूल बनविला जाणार असून तो पूल थेट टॅक्सी स्टँड जवळ जोडला जाणार आहे. सरकारी दवाखाना आणि टॅक्सी स्टँड असा बाहेरच्या बाहेर जोडला जाणार असल्याने या पुलामुळे स्थानिकांना स्थानकातून प्रवास टाळता येणार आहे. तर कर्जत दिशेकडे एक पादचारी पूल निर्माण केला जाणार आहे. हा पूल केवळ फलाट एक आणि दोन यांना जोडणारा असेलच, परंतु हा पूल पुढे थेट नेरळ गावातील मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजूला पार्किंगमध्ये उतरणार आहे. याशिवाय नेरळ स्थानकात प्रवासी निवारा शेड उभारले जाणार असून, या सर्व आराखड्यावर मार्च 2022 मध्ये अंतिम रूप येणार आहे. नेरळ स्थानकाचा कायापालट करण्यासाठी करोडो रुपयांचा निधी रेल्वे खर्च करणार आहे.
-संतोष पेरणे, खबरबात