Breaking News

स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या निर्मितीचे घोडे अडले; विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

माणगाव : प्रतिनिधी

दिघी-पुणे राष्ट्रीय मार्गावरील माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्यागिक क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. मात्र स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती झाली नसल्याने या भागातील सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. माणगाव तालुक्यात औद्योगिक वसाहत विकसित करण्यासाठी सुमारे 30 वर्षापूर्वी विळे-भागाड परिसरातील जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. या विळे-भागाड औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक लहान-मोठे देशी, विदेशी कारखाने उभे राहिले आहेत. या कारखान्यात काम करण्यासाठी जिल्हा व जिल्ह्याबाहेरून, तसेच अन्य राज्यांतून मोठ्या संख्येने कामगार आले आहेत. त्यामुळे निजामपूर, भागाड, विळे यासह अनेक गावांतील बाजारपेठा गजबजलेल्या दिसतात. येथून जवळच ताम्हाणी घाटातील कोंडेथर गावाजवळील घाटात पावसाळ्यात धबधबे व या मार्गांनी पुणे परिसरातून मोठ्या प्रमाणावर येणारा पर्यटक यामुळे, तसेच घाटातील अपघाताचे वाढते प्रमाण बघितले, तर या भागात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे या एमआयडीसीत स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती होणे गरजेचे होते, मात्र ते झाले नसल्याने गुन्हेगारीला रान मोकळेच राहत आहे. या भागातील रवाळजे धरणाचे काम सुरू असताना मोठ्या प्रमाणात मजूर व नोकर आले होते. त्याचा विचार करून 1982 मध्ये माणगाव तालुका पोलीस ठाण्यांतर्गत रवाळजे येथे पोलीस दूरक्षेत्राची इमारत उभारून पोलीस कर्मचारी नेमण्यात आले होते. रवाळजे धरणाचे काम संपून 32 वर्षे झाली. त्यानंतर येथील कामगारही निघून गेले, तरीही या ठिकाणचे पोलीस कर्मचारी तेथेच काम करत आहेत. रवाळजे पोलीस दूरक्षेत्र हद्दीत रवाळजे, विळे, विळे वरचीवाडी, खालचीवाडी, सणसवाडी, भाऊची आळी, गावठाण, बेडगाव, विळे आदिवासीवाडी, धनगरवाडी, कोंडेथर, पाटणूस, पाटणूस आदिवासीवाडी, पाटणूस धनगरवाडा, भिरा, भिरा वसाहत, भैरेची वाडी, विठ्ठल वाडी, हिर्डी, फणशीदांड, गौळवाडी, गोळे आदिवासीवाडी, म्हसेवाडी, लव्हेलीवाडी, साजे, साजे आदिवासीवाडी, बौद्धवाडी, नारायण गाव, भागाड, भागाड आदिवासीवाडी, तासगाव, तासगाव आदिवासीवाडी आदी गावे येतात. तेथे एकूण सुमारे 10 हजार लोकसंख्या आहे, परंतु रवाळजे हे गाव एका बाजूला असून अन्य गावे दुसर्‍या बाजूला आहेत. त्यामुळे या पोलीस दूरक्षेत्र ठाण्याचा उपयोग आजूबाजूच्या गावांना होत नाही. या सर्व बाबींचा विचार करून विळे या गावात किंवा औद्यागिक क्षेत्रात स्वतंत्र पोलीस ठाणे उभारावे, अशी नागरिकांची मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे. मात्र या मागणीचा विचार शासनाने अद्यापही केलेला दिसत नाही. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यातील औद्यगिक विकास महामंडळाने पोलीस ठाण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रासाठी सर्व यंत्रणा व सुविधांसह स्वतंत्र पोलीस ठाणे उभारण्यात येतील, असे जाहीर केले होते. मात्र विळे-भागाड एमआयडीसीसाठी शासन अद्यापही उदासीन का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply