Monday , January 30 2023
Breaking News

मिनीट्रेन शटलच्या बोग्या वाढवा

पर्यटकांसह नागरिकांची मागणी

कर्जत ः प्रतिनिधी

पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या व माथेरानचे पर्यटन बहरवणार्‍या माथेरानची राणी अर्थात मिनीट्रेनच्या बोग्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी तसेच पर्यटकांकडून करण्यात येत आहे. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता ही मागणी करण्यात येत आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव मिनीट्रेन अनिश्चित कारणासाठी बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला होता. पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर डिसेंबरच्या 26 तारखेला नेरळ-माथेरान ट्रायल घेतली गेली व सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने अमन लॉज-माथेरान मिनीट्रेन शटल सेवा सुरू केली. ही शटल सेवा सहा बोग्यांची करण्यात आली आहे. यात तीन द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी व दोन गार्ड बोग्या असे स्वरूप असून एका फेरीत फक्त 119 प्रवासी प्रवास करू शकतात, मात्र शटलसेवा सुरू झाल्याने पर्यटकांचा ओघ माथेरानकडे वाढला आहे. पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता हौशी पर्यटकांना या मिनीट्रेन सफरीचा आनंद घेता येत नसल्याने त्यांचा पुरता हिरमोड  होत आहे, तसेच लहान मुले व ज्येष्ठांना तिकीट न मिळाल्याने त्यांना खिशाला कात्री लावून इच्छितस्थळी जावे लागते. याआधी शटल सेवेच्या फेर्‍या आठ बोग्या लावून केल्या जात होत्या. त्या वेळी पर्यटकांना मिनीट्रेनचा पुरेपूर आनंद घेता येत होता. त्यामुळे रेल्वेच्या महसुलातही भर पडत होती, पण सध्या सुरू असलेल्या शटलसेवेच्या सहा बोग्या कमी पडत आहेत. रेल्वेला महसूलही कमी मिळत आहे. शनिवार-रविवारी पाच हजारांपेक्षा जास्त पर्यटक येतात. त्यामुळे मिनीट्रेनच्या बोग्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी पर्यटकांकडून जोर धरू लागली आहे.

अमन लॉज-माथेरान शटलसेवा सुरू होऊन एक महिना झाला आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची संख्या वाढली. मी या शटलसेवेने दररोज प्रवास करतो, पण काही वेळेस तिकीट न मिळाल्यामुळे पायपीट करावी लागते.

-पवन गडवीर, स्थानिक

माथेरान आमचे आवडते डेस्टिनेशन आहे. त्यामध्ये मिनीट्रेन हे आमचे आकर्षण आहे. त्यामुळे आम्ही माथेरानला मिनीट्रेनची मजा घ्यायला जातो. याअगोदर शटल सेवेच्या आठ बोग्या होत्या. त्यामुळे तिकीट मिळत होते, पण आता सहा बोग्या असलेली शटल धावत आहे. त्यामुळे तिकीट मिळणे कठीण झाले आहे. रेल्वेने लवकरच आठ बोग्यांची शटलसेवा सुरू करावी.

-विशाल नवले, प्रवासी, नाशिक

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply