उरणसह पाच स्थानकांची कामे प्रगतीपथावर
उरण : प्रतिनिधी
मागील 27 वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या नेरूळ ते उरण प्रवासी रेल्वे मार्गाच्या रुळांची तपासणी सुरू आहे. त्याचप्रमाणे या मार्गावरील रेल्वेस्थानकांच्या कामालाही वेग आला आहे. त्यामुळे खारकोपर ते उरण रेल्वेमार्गावरील वाहतूक लवकरच सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
उरण तालुका हा नवी मुंबईच्या विकासाचा भाग आहे. त्यामुळे या तालुक्याला नवी मुंबईला जोडण्यासाठी नवी मुंबईतील नेरुळ ते उरण या प्रवासी रेल्वेमार्गाची घोषणा रेल्वे विभागाने 1997ला केली होती. तेव्हापासून उरणकारांना या रेल्वे मार्गाची प्रतिक्षा आहे, मात्र या रेल्वे मार्गात वारंवार अनेक अडथळे निर्माण होत गेले. त्यामुळे मागील 27 वर्षांपासून हा मार्ग रखडला आहे. उरणच्या विकासाचा वेग येथील अनेक राज्य, केंद्र व खासगी प्रकल्प आणि उद्योगांमुळे वाढला आहे, तसेच सिडको आणि खासगी बांधकाम व्यवसायामुळे निर्माण होणारे नागरीकरण आणि लोकसंख्या यांच्या दळणवळणा साठी रेल्वेची आवश्यकता वाढली आहे. दुसरीकडे पुढील वर्षभरात होणारा उरणचा विकास यामुळे खुद्द पंतप्रधान कार्यालयाने या रेल्वे मार्गाच्या कामाला प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या कामाला वेग आला असून उरण रेल्वे स्थानकासह बोकडविरा, नवघर, रांजणपाडा व गव्हाण रेल्वेस्थानकांची कामे प्रगतीपथावर आहेत.
2023मध्ये रेल्वे मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न
रेल्वे व सिडकोच्या माध्यमातून या मार्गावरील रेल्वेरूळ, स्थानके व येथील सुविधा यांच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळेच उरण स्थानकापासून येथील रेल्वे रुळांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र रेल्वेचा वापर केला जात आहे. त्यामुळे उरण ते खारकोपर दरम्यानची रेल्वेसेवा लवकरच सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.