रायगड जिल्ह्याशी थेट संपर्क असलेल्या प्रतापगडाची 58 एकर जमीन सातारा संस्थानच्या नावे असल्याने संपूर्ण प्रतापगड परिसर त्या जिल्ह्याशी संलग्न आहे, मात्र यंदाच्या अतिवृष्टी आणि भूस्खलन काळात प्रतापगडाच्या मदतीला रायगड जिल्ह्याचे प्रशासन धावून गेले. प्रतापगडावरील मशाल मोर्चा असो अथवा प्रतापगडावरील अफझलखानाच्या कबरीची नासधूस केल्याची घटना, या सर्व घटनांमध्ये रायगड जिल्ह्याचा समावेश प्रकर्षाने दिसून येतो. अनेक वर्षे प्रतापगडाभोवती राजकारण फिरत असताना न्यायालयीन निकालाच्या भिजत घोंगड्यामध्ये राजकीय चर्चा व विरोधी मतांना ऊत येऊन सामाजिक तेढ वाढतच जात आहे. कधी कोणाला प्रतापगड परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी या अफझलखानाच्या कबरीचा विषय उकरून काढायचा आहे, तर कोणाला या परिसरातील शांतता नष्ट करून जातीधर्माची तेढ निर्माण करून सत्तेची पोळी भाजून घ्यायची आहे. ही कबर साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधली असल्याच्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून राजकीय स्वार्थापोटी सामाजिक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रघात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. कबरीचे सौंदर्यीकरण असो अथवा उदात्तीकरण याबाबत विविध जाज्वल्य मतांनी खळबळ माजविणार्या या मानसिकतेवर ‘नरो वा कुंजरोवा’ अशी भूमिका न घेतली गेल्यास स्फोटक विचारांमुळेही स्फोट घडविले जाऊ शकतात, हे स्पष्ट आहे. अफझलखानाच्या पायथ्याशी सुरू असलेले उदात्तीकरण थांबविण्यासाठी श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने शिवभक्तांचे आंदोलन उभे केले होते. याची दखल घेऊनच अफझलखानाच्या कबरीचा परिसर बंद करण्यात आला होता, मात्र प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारी अफझलखान व सय्यद बंडा यांच्या कबरींचा परिसर तातडीने पर्यटकांसाठी खुला करावा, अशी मागणी नुकतीच श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनाही निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अफझलखान वधाच्या दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा केला जातो. गडाच्या पायथ्याशी झालेल्या शिवप्रतापामुळे तरुणांना राष्ट्रीय विचार व दहशतवाद्यांविरोधात लढण्याची प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गडकिल्ल्यांवर येतात, तरीही गडाच्या पायथ्याशी असणार्या अफझखानाच्या कबरीच्या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात येतो. त्यामुळे शिवप्रतापाचा इतिहास पाहण्यापासून शिवभक्तांना वंचित ठेवण्यात येते. त्यामुळे कबर खुली करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीने ठोस भूमिका घेऊन लवकरच निर्णय घ्यावा. शिवरायांचे शौर्य पाहण्यासाठी आता कोणत्याही समाजाचा विरोध नसल्याने प्रशासनाने तत्काळ कबरीचा परिसर खुला करावा, अशी मागणी त्यांनी केली. विजापूरचा राजा अदिलशहा होता. त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या सर्व क्षेत्रावर आधिपत्य मिळविले होते. 1659 मध्ये विजापूरचा राजा आदिलशाहसाठी छत्रपती शिवाजी महाराज जणू एक संकट होते. त्याला समजले होते की जर छत्रपती शिवाजी महाराजांना संपविले नाही तर ते आपल्यासाठी धोकादायक असू शकतं. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा प्रयत्न बर्याच वेळा केला होता, परंतु त्याला यश मिळाले नाही. शेवटी अफजलखानाला पाठविण्यात आले. तो दिवस होता 10 नोव्हेंबर 1659चा. अफजल खान रणनीती बनविण्यात पटाईत होता. त्याने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांची हत्या केली होती. वाटेत येणारी गावे आणि मंदिरे उद्ध्वस्त करीत तो वाईपर्यंत पोहोचला आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटावयास बोलाविले, मात्र आम्ही आपल्याला घाबरलो आहोत, मी तिथे येत नाही, आपणच जावळी प्रांतात या, असा निरोप छत्रपती शिवाजी महाराजांनी धाडला. अफजलखान ढोरप्याच्या डोंगराच्या पायथ्याशी पोहोचला. तिथे त्यांच्या भेटण्याची व्यवस्था केली. भव्य शामियाना उभारला होता. प्रतापगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज होते. कोणत्याही सैन्याला तिथवर पोहोचणे अवघड होते. अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याचा निरोप पाठविला. छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच्या घातपाती स्वभावाची जाणीव होती. भेटीसाठी कोणतेही हत्यार कोणाकडे नसतील आणि दोन्ही पक्षाचे 10 अंगरक्षक असतील. त्यापैकी एक शामियान्याबाहेर थांबेल, अशी अट ठरली. भेटीच्या वेळी अफजलखान वेळेआधीच शामियान्यात पोहोचला.शामियाना मोठा होता. अफजल खान काही कटकारस्थान करून घातपात करेल याचा अंदाज छत्रपती शिवाजी महाराजांना आला होता. म्हणून त्यांनी आपल्या अंगरख्याखाली चिलखत घातले. जिरेटोपाखाली शिरस्त्राण घातले आणि मुठीत सहज न दिसणारी अशी वाघनखे लपविली होती. दोघांचे वकीलच बरोबर असतील असे ठरले. छत्रपती शिवाजीराजे न घाबरता शामियानात पोहोचले. त्यांना बघून ‘या शिवा आमच्या मिठीत या’ असे म्हणत अफजल खानाने मिठी मारण्यासाठी हात पसरविले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मिठी मारली. त्या वेळी अफजल खानाने लपविलेल्या कट्यारीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत वार केला आणि त्यांना आपल्या काखेत दाबण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज पूर्वीपासून सावध होते. खानाच्या प्रहाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुठीतील वाघनखे काढून त्याच्या पोटात घुसविली आणि त्याला ठार केले. याच वेळी खानाचा वकील कृष्णाजी भास्कर अंगावर आला आणि महाराजांनी त्याला तलवारीच्या एकाच वारात यमसदनी धाडला. खानाने दगा दगा म्हणत आकांत केला. त्याचा आवाज ऐकून बाहेर उभा असलेला सय्यद आत आला. त्याने शिवाजी महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत जिवा महालाने सय्यद बंडाला ठार मारून महाराजांच्या प्राणाचे रक्षण केले. झाडीत लपलेल्या सर्व मावळ्यांनी माकड हल्ल्याचे तंत्र वापरून खानाच्या सैन्याला पळवून लावले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ढोरप्याच्या डोंगराचे रूपांतर प्रतापगड किल्ल्यामध्ये केले. यामुळे इतिहासात हे युद्ध प्रतापगड युद्ध म्हणून ओळखले जाते. प्रतापगडाबरोबर अफझलखानाच्या वधाचा उल्लेख करून गेल्या 15 वर्षांत अनेक ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रकार होत असल्याचे उघडकीस आले आहे. पवित्र धर्मग्रंथ कुरआनमध्ये मृत व्यक्तीच्या कबरीचे अथवा दर्ग्याचे अस्तित्वही जाणवू नये, अशा प्रकारचे बांधकाम असावे, असे मार्गदर्शक तत्त्व असताना अफझल खानाच्या कबरीचे दर्गा म्हणून उदात्तीकरण होत असल्याची बोंब ठोकणार्यांनीच ते उदात्तीकरण करण्यासाठी कर्णोपकर्णी प्रयत्न केले असण्याची शक्यता आहे. अफझल खानाच्या कबरीच्या फलकाची मोडतोड झाल्यानंतर दाखल झालेला खटला अनेक वर्षांपूर्वी संपुष्टात येऊनही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून या कबरीच्या परिसरामध्ये प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे. हे भिजत घोंगडे सत्ताधारी आणि प्रशासनाकडूनच वर्षानुवर्षे ठेवण्यात आले आहे. यामध्ये बदल घडण्याची आवश्यकता आहे.
– शैलेश पालकर