नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनाचे संकट, लॉकडाऊन, अनलॉकनंतर आता महागाईचे वारे वाहत आहेत. त्यातच सध्या भाज्या आणि कडधान्यांचे दर कडाडले आहेत. भाज्या महागल्यानंतर महिलांसाठी आधार ठरणार्या डाळी, कडधान्यांचे दरही वाढल्याने महिलांसमोर पेच निर्माण झाला आहे.
नवरात्रात नऊ दिवसांच्या उपवासानंतर आता स्वयंपाकात रोज काय नवीन तयार करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. शिवाय पुन्हा शंभरीपार केलेल्या कांद्याने पुन्हा डोळ्यात पाणी आणले असून वाढत्या दरांमुळे महिन्याचे अर्थगणित सांभाळणे गृहिणींसाठी डोकेदुखी ठरत आहे.
कोरोना संकटात अनेकांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली आहे. अजूनही अनेकांची पगारकपात कायम असल्याने आर्थिक चणचण कायम आहे. त्यातच हवामानातील बदल आणि वेळीअवेळी बरसणार्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांच्या किंमती वाढल्या आहेत. कोरोना, लॉकडाऊनमुळे वाहतुकीवर झालेल्या परिणामामुळे धान्यांची आवक घटल्याने कडधान्यांचे दरही वधारले आहेत. त्यामुळे भाज्या महागल्यावर कडधान्यांकडे मोर्चा वळणार्या महिलांसमोर आता मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यातच कांदे, बटाटे, लसूण यांचे दरही दिवसेंदिवस चढेच असल्याने सर्वसामान्यांचे गणित कोलमडले आहे.
मध्यंतरी झालेल्या चक्रिवादळामुळे, अतिवृष्टीमुळे शेती-बागायतीला मोठा फटका बसून फळ-भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. घाऊक बाजारातच भाज्यांचे दर अधिक असल्याने आम्हालाही वाढीव दराने भाज्यांची विक्री करावी लागत आले.
– नवनाथ डांगले, विक्रेते, खारघर
भाज्यांचे दर वाढल्यामुळे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सध्या आहारात कडधान्यांचा वापर वाढवला आहे. मात्र त्यांचेही दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने रोज स्वयंपाकात काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच सध्या आर्थिक चणचण असल्याने महिन्याचा ताळमेळ बसवणे कठीण जात आहे. कांद्याने तर पुन्हा डोळ्यात पाणी आणल्याने त्यांचा वापर कमी केला आहे.
-अल्पना शिंदे, वाशी
नवी मुंबईच्या घाऊक बाजारात अफगाणिस्तानचा कांदा दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – वाशीतील घाऊक बाजारात आता विविध देशातील कांद्याची आवक होण्यास सुरुवात झाली असून इराण, इराकपाठोपाठ अफगाणिस्तानचा कांदा दाखल झाला आहे. या परदेशी कांद्याच्या येण्याने भाववाढीला लगाम लागला असून, देशी कांद्यांचे दर 50 ते 65 रुपये किलो झाले आहेत. तर परदेशी कांद्याचे दर 40 ते 45 रुपये किलोवर आले आहेत.
पावसामुळे देशी कांद्याचे 50 टक्के नुकसान झाले असून पुढच्या काळात कांद्याची टंचाई भासणार आहे. त्यामुळे अनेक व्यापार्यांनी परदेशी कांदा मागवायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी पहिल्यांदा इराणचा कांदा बाजारात दाखल झाला. त्यापाठोपाठ इराक, आणि आता अफगाणिस्तानचा कांदा बाजारात आला आहे. कांद्याची बाजारातील पुढची मागणी पूर्ण करण्यासाठी येत्या काळात आणखी परदेशी कांदा काही व्यापार्यांनी मागवला आहे. परदेशातून येणारा हा कांदा समुद्रामार्गे येत असल्याने 15 ते 18 दिवस जातात. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत आणखी परदेशी कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे.
हा परदेशी कांदा बाजारात येत असल्याने हॉटेल व्यावसायिकांकडून कांद्याला असलेली मागणी पूर्ण होत आहे. त्यामुळे काही प्रमाणात कांद्याची कमतरता भरून निघत आहे. पुढचे दोन आठवडे तरी कांद्याचे दर वाढणार नसल्याचे चित्र बाजारात आहे. परदेशी कांदा बाजारात येत असल्याने आत्ता पुन्हा कांद्याची रोजची आवक 70 ते 80 गाड्यांवर आली आहे.
कांद्याच्या वाढत्या दराला लगाम लागला असून अगदी 80 रुपये किलोपर्यंत गेलेले कांद्याचे दर घाऊक बाजारात 60 ते 65 रुपये किलोवर आले आहेत. त्यामुळे कांद्याचे दर उतरले असून दरवाढ थांबली आहे.
-मनोहर तोतलानी, कांद्याचे व्यापारी
RamPrahar – The Panvel Daily Paper