नवी मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई, पनवेलमध्ये कोरोनाची दुसरी लाट शिखरावर असताना रुग्णालयांत खाटाही उपलब्ध होत नव्हत्या. नवी मुंबईत हजारच्या आसपास दररोज रुग्ण आढळत होते. अशीच भीषण परिस्थिती पनवेलमध्येही होती, परंतु आता या आजाराचा विळखा सैल झाला आहे. दररोज 25 पेक्षा कमी नवीन रुग्णांची भर पडत आहे. नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब ठरत आहे.
कोरोनामुळे लागू केलेले निर्बंध सणाच्या निमित्ताने राज्य सरकारने कमी केले. त्यानंतरही शहरात रुग्ण नियंत्रणात ठेवण्यात नवी मुंबई आणि पनवेल महापालिकांना यश आले आहे. दिवाळी झाल्यानंतरही नवी मुंबईत 25 नवीन रुग्णांची भर पडत आहे. कोविडच्या दुसर्या लाटेचा अनुभव पाहता नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य विभागाला अधिक कोविड चाचण्यांवर भर देण्याचे
निर्देश दिले आहेत. दिवसाला तीन ते चार हजार चाचण्यांचे प्रमाण वाढवून आता ही संख्या दिवसाला सात हजार चाचण्यांच्या घरात आहे. एवढ्या अधिक प्रमाणात चाचण्यानंतरही नवी मुंबईत दिवसाला सरासरी 25 रुग्ण सापडत आहेत, तसेच रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. शून्य मृत्यूच्या दिनाचे प्रमाण नोव्हेंबरमध्ये वाढले आहे.
पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेच्या हद्दीत कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना आखण्यात आल्या. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या उतरणीला लागली आहे. गणेशोत्सवानंतरचा रुग्णांचा उतरता आलेख दिवाळी सणानंतरही कायम आहे.
पनवेल महापालिकेच्या हद्दीत 125 रुग्ण उपचार घेत आहेत, तसेच पनवेल महापालिकेतही दिवसाला सरासरी तीन हजार चाचण्या केल्या जातात; परंतु दिवसाला सरासरी 15 रुग्ण आढळत आहेत. दोन्ही महापालिकांमध्ये कोविड रुग्णांची संख्या मर्यादित आहे.
कोरोना लसीकरणाला प्राधान्य
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणही पनवेल व नवी मुंबई महापालिका हद्दीत वेगात सुरू आहे. बहुतेक नागरिकांचा पहिला डोस झाला असून दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्याही अधिक आहे.कोरोना लसीकरणासंदर्भात विविध जनजागृती कार्यक्रम, तसेच विषेश मोहीम राबविल्या जात आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने सर्व व्यवहार पूर्ववत होत असल्याने येथील नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळाला.