नवीन जलवाहिनी जोडणीचे काम सुरू

खारघर : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेकडून ओवे कॅम्प गावात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जलवाहिनी जोडणीचे काम सुरू झाल्याने पाणीसमस्या दूर होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहे. या कामी भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
गावात जाणारी जलवाहिनी कमी व्यासाची आणि जीर्ण झाल्याने अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगरसेवक हरेश केणी, भाजप कार्यकर्ते संतोष रेवणे, रामचंद्र जाधव, संतोष भातोसे, सुनील साळुंखे यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे पत्रव्यवहार करून या कामी पाठपुरावा केला, तसेच नवीन जलवाहिनी टाकण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत पनवेल महापालिकेच्या माध्यमातून टाटा रुग्णालय परिसरातील सिडकोच्या माध्यमातून नवीन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
याविषयी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात विचारणा केली असता, जीर्ण झालेल्या जलवाहिनीतून पाणी गळती होत होती. त्यामुळे पुरेसा पाणीपुरवठा होत नसे. नवीन जलवाहिनीमुळे ओवे कॅम्प गावातील पाणी समस्या दूर होणार आहे, असे सांगण्यात आले.
सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेकडून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गावात मुबलक पाणीपुरवठा होईल.
-रामचंद्र जाधव, ग्रामस्थ, ओवे कॅम्प